Chhagan Bhujbal : ..तरच अजितदादा CM होतील; भुजबळांनी सांगितलं आमदारांच्या संख्येचं गणित
Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी कुणाची याबाबत लढा सुरू असला तरी पक्ष अजित पवार यांच्याबरोबरच आहे. न्यायाचा तराजू त्यांच्याच बाजूने झुकणार आहे. आज पक्षाच्या आमदारांची संख्या 45 आहे. यात वाढ करून 80 ते 90 करावे लागतील. त्यानंतरच अजितदादा मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आगामी काळात जिथे म्हणून निवडणुका असतील तिथं अजितदादांची माणसं निवडून आली पाहिजेत. त्याची जबाबदारी तु्म्हाला आम्हाला सगळ्यांनाच उचलायची आहे, असे भुजबळ म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे त्याला कुणाचाच विरोध नाही. केवळ अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशीच सर्वांची भूमिका आहे. असे असतानाही मला टार्गेट केलं जात आहे. एकमेकांची माथी भडकावण्याचे काम कुणीच करू नये अशी अपेक्षाही भुजबळ यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अजित पवार सरकामध्ये सामील झाले त्याच्या आधीपासूनच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री होण्याची सगळी पात्रता असतानाही त्यांना सीएम पदाने कायमच हुलकावणी दिली. आताही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर या चर्चांनी जास्तच उचल खाल्ली आहे. अजित पवार गटातील नेतेही आता अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी वक्तव्ये करत आहेत.
Maharashtra Politics: ‘आमच्या मंत्रीमंडळातही अजित पवारांनी हेच केलं, वडेट्टीवार यांची जळजळीत टीका
जेव्हा सांगायचं तेव्हा स्पष्ट सांगून टाकेल – अजित पवार
याआधी या मेळाव्यात अजित पवार यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी राज्य सरकारमध्ये नाराज नसल्याचे म्हटले. मध्यंतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीची बातमी आली. या बैठकीत मी आणि छगन भुजबळ शेजारीच बसलो होतो. तरीदेखील आमच्यात वाद झाल्याच्या बातम्या आल्या. नाराज असल्याच्याही बातम्या आल्या. नाराजी वगैरे काही नाही. राज्याचं नेतृत्व करायचं म्हटलं की काही अडचणी येणार. खरं तर आम्ही सगळे राज्याचं हित डोळ्यांसमोर ठेऊन वाटचाल करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठीच आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. त्यामुळे नाराजीच्या बातम्यांवर आजिबात विश्वास ठेऊ नका. ज्यावेळी मला काही सांगायचं असेल तेव्हा स्पष्टच सांगून टाकील मागं काहीच ठेवणार नाही