Ajit Pawar : ‘जेव्हा सांगायचं असेल तेव्हा स्पष्टचं सांगून टाकेल’; नाराजीच्या चर्चांना अजितदादांचा फुलस्टॉप!

Ajit Pawar : ‘जेव्हा सांगायचं असेल तेव्हा स्पष्टचं सांगून टाकेल’; नाराजीच्या चर्चांना अजितदादांचा फुलस्टॉप!

Ajit Pawar : काही दिवसांपूर्वी झालेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा या दोन्ही वेळी अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित नव्हते. त्यामुळे अजित पवार राज्य सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर अजितदादांना थेट पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. यामागे त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न होता असाही सूर व्यक्त झाला. आता मात्र या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर खुद्द अजित पवार यांचे वक्तव्य समोर आले आहे. नाराजीच्या चर्चा फेटाळून लावत त्यांनी या सगळ्या प्रकारावर कायमचा फुलस्टॉप दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कृतज्ञता मेळाव्याला उपस्थिती लावली.

या मेळाव्यातच त्यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या. या मेळाव्यास अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवळ, आमदार नितीन पवार आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, मध्यंतरी मंत्रिमंडळाच्या बैठकीची बातमी आली. या बैठकीत मी आणि छगन भुजबळ शेजारीच बसलो होतो. तरीदेखील आमच्यात वाद झाल्याच्या बातम्या आल्या. नाराज असल्याच्याही बातम्या आल्या.  नाराजी वगैरे काही नाही.  राज्याचं नेतृत्व करायचं म्हटलं की काही अडचणी येणार. खरं तर आम्ही सगळे राज्याचं हित डोळ्यांसमोर ठेऊन वाटचाल करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठीच आम्ही सगळे एकत्र आलो आहोत.

Maharashtra Politics: ‘आमच्या मंत्रीमंडळातही अजित पवारांनी हेच केलं, वडेट्टीवार यांची जळजळीत टीका

त्यामुळे नाराजीच्या बातम्यांवर आजिबात विश्वास ठेऊ नका. ज्यावेळी मला काही सांगायचं असेल तेव्हा स्पष्टच सांगून टाकील मागं काहीच ठेवणार नाही, असे सांगत अजित पवार यांनी नाराजीच्या मुद्द्यावर कायमचा पडदा टाकला.

आता कठोर निर्णय घेणार, सहकार्य करा

मी राजकारणात आलो तेव्हा माझा शेतकरी सावकाराच्या दारात जात होता. पण आम्ही कमी व्याजदराने पुरवठा केला. शून्य टक्के दराने कर्ज दिलं. भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं. अडचणी खूप आहेत. आम्ही शांत कधीच बसलो नाही. अडचणी सोडविण्यासाठी काम करत आहोत. नाशिक जिल्हा बँक आज अडचणीत आली. तिला आता आपल्याला बाहेर काढायची आहे. अधिकारी-लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. सरकार म्हणून मी भूमिका घेणारच आहे. मात्र राज्य सहकारी बँकेनेही पुढाकार घेतला पाहिजे.

मी सगळ्यांना सांगतो की अडचणीतील संस्था बाहेर काढायची म्हटलं की काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. माझ्या भागातील कारखाने बँका अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी कठोर निर्णय घेतले. काही जणांना पचनी पडणार नाही पण आता आम्हाला सहकार्य करा. यातून निश्चित मार्ग काढून बँकेला अडचणीतून बाहेर काढू असा शब्द अजित पवार यांनी उपस्थित नाशिककरांना दिला. 

Ajit Pawar : ..म्हणून अजितदादा भाजपसोबत; बावनकुळेंनी सांगितली इनसाइड स्टोरी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube