Eknath Shinde : गेल्या सहा महिन्यातील विकासकामांबद्दल मुख्यमंत्री म्हणाले…
नाशिक : गेल्या सहा महिन्यात आम्ही मोठे निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे जनतेला फायदा झाला आहे. मागच्या अडीच वर्षात काय झालं यात मी जात नाही.
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) हा राज्याच्या विकासाचा महामार्ग आहे. राज्यातील प्रलंबित प्रकल्प केंद्र सरकार तत्काळ मंजूर करत आहे.
2 लाख कोटी रुपयांची तरतूद पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.
गेल्या सहा महिन्यात शासनाने लोकहिताचे निर्णय घेतले. नियमित कर्जफेड करण्याऱ्या शेतकऱ्यांना एका क्लिकवर 2 हजार 500 कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले. राज्यातील 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.
अतिवृष्टी व सततच्या पावसाने बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवून मदत करण्यात आली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नाशिक येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या 11 वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृती, साहित्य आणि प्रदर्शन या त्रिसूत्रीचा योग्य मिलाप अनुभवायला मिळाला आहे. शेतकरी राजासाठी हा कृषी महोत्सव नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.
दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राचे कार्य महत्त्वपूर्ण असून सेंद्रीय शेतीला स्वामी समर्थ केंद्राकडून सदोदित प्रोत्साहन देण्यात येते. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून केंद्राचे काम सुरू असून 450 बचत गटांद्वारे स्वामी समर्थ केंद्रकडून हजारो रोजगार निर्मिती करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक कृषी महोत्सवास उपस्थित राहून मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.