अतिक्रमणात दुकान गेले त्याने स्वतःला संपवले…शेवगावातील दुर्दैवी घटना

अतिक्रमणात दुकान गेले त्याने स्वतःला संपवले…शेवगावातील दुर्दैवी घटना

Ahilyanagar News : शेवगाव शहरातील नेवासा, पैठण, मिरी, पाथर्डी आखेगांव या पाच रस्त्यांवर असलेल्या राज्य महामार्गावरील अतिक्रमणांवर सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. अनेक पक्की अतिक्रमणे देखील जमीन दोस्त करण्यात आली आहे. मात्र या कारवाईमुळे ज्यांचा संसार उघड्यावर आला ते आक्रमक पाऊल उचलत आहे. यातच एकाने चक्क आपली जीवनयात्रा संपवली. पांडुरंग रामभाऊ शिंदे असे या व्यावसायिकाचे नाव आहे.

गुरुवारपासून प्रशासनाकडून शेवगाव शहरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई सुरू आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात या कारवाईला प्रारंभ झाला. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. यातूनच हताश झालेल्या एकाने थेट टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.

याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव शहरातील सलून व्यावसायिक पांडुरंग रामभाऊ शिंदे (वय ५०) यांनी नेवासा रस्त्यावरील जोहरापूर येथील ढोरा नदीमध्ये आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अतिक्रमण जमीनदोस्त केल्याने अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याने अतिक्रमणाचा हा पहिला बळी ठरल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

शेवगावची जनता दडपशाहीला थारा देणार नाही, आमदार मोनिका राजळे कडाडल्या

दरम्यान अतिक्रमणामुळे शहरातील रस्त्यांचा श्वास कोंडला होता. नेहमी वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागत होता. यामुळे प्रशासनाकडून या विरोधात आक्रमक पाऊल उचलण्यात आले. अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले मात्र यातील अनेक व्यावसायिक अत्यंत गरीब परिस्थितीतील आहेत. त्यांची रोजीरोटी आजच बंद झाली आहे. ‘काहींची तर अशी दयनीय अवस्था आहे की काढलेल्या टपरीचे साहित्य घरी नेऊन ठेवण्या इतपतही स्वतःची जागा त्यांच्याकडे नाही.

दरम्यान जे विस्थापित झाले त्यांचे पुनर्वसन व्हायला हवे. त्यासाठी नगरपरिषदेच्या मालकीच्या असलेल्या भूखंडावर पुनर्वसन होऊ शकते अशा अनेक जागा असून त्याचा वापर केल्यास धनदांडग्याना वगळून गरीब व्यापाऱ्यांचे अल्पदरात पुनर्वसन करायला हवे अशी मागणी आता विस्थापित व्यावसायिक करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube