धक्कादायक! मांजरीला वाचवायला गेले अन् जीवाला मुकले; 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल गुढीपाडव्याच्या दिवशी नेवासा तालुक्यातील वाकडी गावात ही हृदयद्रावक घटना घडली. विहीरीत पडलेल्या मांजराला बाहेर काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या तरुणाला बाहेर काढण्यासाठी आणखी चारजण विहिरीत उतरले. या सगळ्यांचा विहीरीतील शेणाच्या गाळात फसून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
माणिक गोविंद काळे, संदीप माणिक काळे, बबलू अनिल काळे, अनिल बापूराव काळे आणि बाबासाहेब पवार असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर या घटनेमध्ये विजय माणिक काळे हे बेशुद्ध अवस्थेत आहे. त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाकडी या गावात येथील एका शेतकऱ्याने बायोगॅसची शेनाची स्लरी एका जुन्या विहिरीत सोडली होती. मंगळवारी सायंकाळी या विहिरीत एक मांजर पडले. मांजरीचा जीव वाचवण्यासाठी बबलू अनिल काळे हा तेथे गेला व विहिरीत पडला. मात्र स्लरी खोलवर असल्याने तो बुडाला.
Bus Fire Accident : मध्यप्रदेशात अपघातानंतर बस पेटली; 12 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी
त्याला वाचविण्यासाठी अनिल काळे यांनी विहीरीत उडी घेतली. मात्र तेही बुडू लागल्याने यांना वाचविण्यासाठी माणिक काळे यांनी व त्यांच्या पाठोपाठ संदीप काळे, बाबासाहेब पवार यांनीही उडी मारली. सगळ्यांचा आरडाओरडा ऐकून विजय काळे यांनी पायाला दोर बांधला व नंतर विहिरीत उडी मारली. परंतु तेही बुडायला लागले. हा प्रकार ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी दोरीच्या मदतीने त्यांना बुडण्यापासून वाचविले. मात्र या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेशुद्ध अवस्थेत आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे.
ग्रामस्थांनी या घटनेची माहिती नेवासा पोलिसांना दिली. यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. या घटनेत एका जणाला वाचविण्यात यश मिळाले. त्यांना नगरमधील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तर राहिलेल्या पाच जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत पोलीस आणि ग्रामस्थ घेत होते.