Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेच मोठा कलंक’; विखे पाटलांचा घणाघात

Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेच मोठा कलंक’; विखे पाटलांचा घणाघात

Radhakrishna Vikhe replies Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते चिडले आहेत. त्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे यांच्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनीही उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे.

विखे नगरमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विखे म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांबद्दल केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आणि त्यांच्या बौद्धीक दिवाळखोरीचं लक्षण आहे. त्यांनी वडिलांच्या विचारांशी फारकत घेऊन सत्ता स्थापन केली. भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात केला हा कलंक नाही का?, स्वातंत्र्यवीर सावकरांबाबत ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुक्ताफळं उधळली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात हा कलंक नाही का?, क्रांतीकारकांच्या विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न तुम्ही केलात’, असा आरोप विखे यांनी केला.

‘राज्यभरात फिरणे बंद कर नाहीतर संपवून टाकू’, आमदार रवी राणांना जीवे मारण्याची धमकी,

‘कोविडच्या संकटात तुम्ही घरात बसून राहिलात. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने घेतलेल्या कोविड सेंटरसंदर्भात रोज बातम्या येत आहेत. त्यात केलेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार. सामान्य नागरिकांच्या टाळूवरचं लोणी तुम्ही खाल्लत हा भ्रष्टाचार नाही का?, मला वाटतं महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षांचा जो कार्यकाळ होता तो राज्याला लागलेला मोठा कलंक आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच मोठा कलंक होतात त्याचं प्रायश्चित्त करण्याऐवजी दुसऱ्यावर मुक्ताफळं उधळता त्यामुळं त्यांनी फडणवीसांबद्दल जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय असून मी त्याचा तीव्र निषेध करतो.’

अडीच वर्षे फेसबुकवरच 

‘उद्धव ठाकरेंच्या आजारावर कुणीच वक्तव्य केलेलं नव्हतं. अडीच वर्षे तुम्ही फेसबुकवरच होतात ना. मंत्रालयात आला नाहीत. लोकांना भेटला नाहीत. राज्यातली जनता वाऱ्यावर होती मग तुमची काय आम्ही पूजा करायची?, तुमच्यावरुन आरत्या ओवाळायच्या का?, आता सत्ता गेल्यावर बाहेर पडून जी धडपड तुम्ही करत आहात ती सत्तेत असताना आम्हाला कधी दिसली नाही. म्हणूनच महाविकास आघाडीचे सरकार आणि त्याचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे हाच मोठा कलंक होता’, अशी घणाघाती टीका विखे पाटील यांनी केली.

डबल इंजिन सरकारला अजितदादांचा तिसरा डबा

‘त्यावेळी राजकीय भूमिका करताना अजित पवार यांच्यावर टीका झाली असेल पण आता ते स्वतः सरकारमध्ये आले आहेत. मला वाटतं त्यांच्यावर जी टीका केली जात होती त्याचे उत्तर आता त्यांना सरकारमध्ये आल्यावर मिळणार आहे. आता आम्ही एकत्र काम करतोय. डबल इंजिन सरकार होतच त्याला आता तिसरा डबा जोडला गेला आहे आता गतीने जनतेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करणार आहोत’, असे विखे म्हणाले.

नितीन देशमुखांनी ठाकरेंनाही मागे टाकलं, बावनकुळे-फडणवीसांवर केली जहरी टीका…

राष्ट्रवादीचं जे झालं तेच काँग्रेसचं होणार 

राज्यातले जे अनेक कुटुंब उद्धवस्त झाले. देशोधडीला लागले. राजकारणातून त्यांना पूर्ण उद्धवस्त करण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून झाला ते सर्व माहिती आहे. इथे कुणी कुणाच्या मध्ये पडायला मोकळं नाही. आपली जी राजकीय वाटचाल राहिली आहे त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ आता आली आहे. हे कोणत्या विचारधारेसाठी एकत्र आले नव्हते तर फक्त सत्तेसाठीच एकत्र आले होते. त्यामुळे त्यांची मूठ कधीच बांधली जाणार नव्हती. राष्ट्रवादीची वाताहत झाली आता काँग्रेसचीही झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला लवकरच दिसेल, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube