आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आता नंबर काँग्रेसचा; विखेंच्या दाव्याने खळबळ!
Ahmednagar News : राज्याच्या राजकारणात सध्या दर दिवशी काहीना काही घडतच आहे. यातच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक पक्षांमध्ये काहीशी चलबिचल देखील सुरू आहे. याच परिस्थितीवर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी मोठे भाष्य केले आहे. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले. यातच आता काँग्रेसमध्ये देखील लवकरच फूट पडेल, असा दावा मंत्री विखे यांनी केला आहे.
दीड वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर मागील जुलै महिन्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. आता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षच फुटायचा राहिला आहे. सत्ताधारी गटातील नेत्यांकडून काँग्रेस लवकरच फुटणार असल्याचे दावे केले जात आहेत. मंत्री विखेंच्या वक्तव्याचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष खरेच फुटणार का, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
‘2024 साठी आशिर्वाद मागता, आधी फडणवीसांकडून शिका’; ठाकरे गटाचा मोदींना खोचक सल्ला
शिर्डी येथील काकडी येथे विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विखे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत काँग्रेसबाबत देखील मोठे वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) भेटीबाबत विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांनी (Vijay Wadettiwar) केलेल्या दाव्यावर विखेंनी भाष्य केले.
लोकप्रियता मिळवण्यासाठीच असे दावे केले जातात परंतु हे दावे कशाच्या आधारावर केले याचे उत्तर वड्डेटीवारांनी दिले पाहीजे. काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडणार या केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्याला दुजोरा देत काँग्रेसमध्ये सध्या वेट अँड वॉचची स्थिती आहे.
मंत्रीपद मिळालं नाही तर नारायण राणे मला..; गोगावलेंनी सांगितले आमदारांच्या मंत्रीपदाचे किस्से
राणे काय म्हणाले होते ?
काँग्रेसचे काही आमदार लवकरच भाजपमध्ये येणार आहेत, असा दावा करत आम्ही सर्वपक्षीय सरकार स्थापन करत आहोत, असे मोठे विधान केंदीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते. राणेंनी माध्यमांशी बोलताना केलेल्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुका आल्या की नेत्यांच्या पक्षांतराचे प्रमाण वाढत असते. आता राणे यांनी केलेल्या दाव्यानंतर कोणाचे पक्षांतर होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.