पवारांची खेळी तेव्हा अन् आताही फायद्याचीच; लोकसभेच्या कमी जागेत विधानसभेचं लॉजिक

पवारांची खेळी तेव्हा अन् आताही फायद्याचीच; लोकसभेच्या कमी जागेत विधानसभेचं लॉजिक

Sharad Pawar on MVA Lok Sabha Election Seat Sharing : राज्यात ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी आमदारांची संख्या जास्त असतानाही मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देऊन त्याबदल्यात वजनदार खाती स्वतःकडे घेण्याची चाणाक्ष खेळी शरद पवार खेळत असत. त्यांच्या या खेळीवर स्वपक्षातील नेते नाराज असायचे. खुद्द अजित पवार यांनीही नाराजी व्यक्त केली होतीच. पण, शरद पवार तेव्हाही ठाम होते. आता लोकसभेच्या निवडणुका आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने पक्षाची ताकद घटली आहे. एक खासदार अजितदादांच्या गटात गेला आहे. अशी परिस्थिती असताना महाविकास आघाडीच्या जागावाटपात अशीच काहीशी खेळी पवारांनी खेळल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारानिमित्त शरद पवार नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपात कमी जागा का घेतल्या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले. पवार म्हणाले, लोकसभेसाठी आमच्या पक्षाने कमी जागा घेतल्या त्या जाणीवपूर्वक घेतल्या आहेत. विधानसभेसाठी आम्ही अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आता जागावाटपात जास्त ताणले नाही.

Sharad Pawar: ..तर पाणी मिळणार नाही; बारामतीकरांना धमकी, शरद पवारांनी वाचली चिठ्ठी

महाविकास आघाडीला राज्यात अनुकूल वातावरण आहे. महाविकास आघाडी लोकसभा निवडणुक एकत्रितपणे लढत आहे. 50 टक्के जागा या महाविकास आघाडीला मिळतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. अजित पवारांच्या सभेवर बोलताना शरद पवार म्हणाले, शरद पवार शेवटची सभा बारामतीला घेतात ते मैदान अजित पवारांनी बुक केलं आहे. मैदान आरक्षित असेल तर दुसऱ्या दिवशी अथवा मैदान बदलून सभा घेऊ. मैदानाने फरक पडत नाही विचार महत्त्वाचे असतात असा टोला शरद पवारांनी अजितदादांना लगावला.

भाजपसोबत आम्ही कधीच जाणार नाही

यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले. अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. भाजपच्या वरिष्ठांसोबत चर्चा झाली व त्यांच्यासोबत जाण्याचे देखील ठरले. पण मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला असा खुलासा अजित पवार यांनी केला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही सहमती नव्हती व कधीही राहणार नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार यांनी खुलासा केला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube