मुंडे, तावडे, खडसेंच्या मार्गावर राम शिंदेंची वाटचाल? खच्चीकरणाच्या चर्चा अन् वरिष्ठांची शांतता!
विष्णू सानप –
पुणे/अहमदनगर : मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेत आहे. तसं तर भाजपची प्रतिमा म्हणजे शिस्त पाळणारा पक्ष अशी आहे. पण ही शिस्त राम शिंदे आणि विखेंनी वेशीला टांगल्याचं साध्याच चित्र दिसत आहे. दरम्यान, इतकं काही खुलेआम प्रसारमाध्यमांसमोर चाललं असतानाही राज्यातील ज्येष्ठ नेते गप्प का? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांचं गप्प राहणं हे राम शिंदेंच्या नक्कीच हिताचं नाही. त्यामुळे एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यानंतर मूळ प्रवाहाबाहेर पाठविण्यात आता नंबर राम शिंदेंचा तर नंबर नाही ना? अशाही चर्चा आता रंगू लागल्या आहेत. (BJP leader, Minister Radhakrishna Vikhe Patil vs BJP MLA Ram Shinde Conflict)
राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील वाद हा बाजार समितीच्या निवडणुकीवरुन सुरू झाला असला तरी विखेंमार्फत शिंदे यांचे खच्चीकरण तर केले जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याआधी भाजपकडून अर्थात ज्यांच्या हातात राज्याची सूत्रे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्यात आले होते. आता शिंदेनबाबतही तसाच काहीसा प्रकार होताना दिसत आहे. बाजार समिती निवडणुकीत झालेला प्रकार सर्वांसमोर आहे. मात्र, शिंदेंची कैफियत ऐकून घेण्याच्या मनस्थितीत भाजप श्रेष्ठी मात्र दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचं दुःख खुल्या प्रसारमाध्यमांसमोर मांडाव लागत आहे. यामुळे शिंदेंना एकट पाडण्याचा तर डाव नाही ना, अशा चर्चा आता जिल्हाभर रंगत आहेत.
सुजय विखेंचे राम शिंदेंना प्रत्युत्तर; रोहित पवारांना पाठिंबा देण्यावर कोण विश्वास…
दरम्यान, काल (18 मे) पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीला राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे हे तिघेही उपस्थित होते. मात्र, या ठिकाणी त्यांना याबाबत काहीही बोलणं न असल्याचं समजते. त्याउलट आम्ही दोघांना एकत्र बसून समजूत काढल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पत्रकार परिषदेत बोलले. मात्र, अशी भेट न झाल्याचं सांगत त्यांचं पितळ राम शिंदेंनी काही वेळातच उघडे पाडले. तशी प्रतिक्रियाच खुद्द राम शिंदे यांनीच दिली. यावर फडणवीस यांनी आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. याचा नेमका अर्थ काय समजायचा? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे…
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होऊ लागली. त्यात पंकजा यांनी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं बोलून दाखवलं. यानंतर त्यांच्या राजकीय पतनाची सुरुवात झाली. त्यानंतरच त्यांच्यावर कथित चिक्की घोटाळा, तसेच अन्य आरोप होऊ लागले. त्यानंतर त्यांचेच विश्वासू आणि समर्थक नेत्यांना फडणवीसांकडून ताकद दिली जाऊ लागली. पंकजा यांचे समर्थक मानले जाणारे याच राम शिंदे यांना पंकजा यांचं जलसंधारण खातं देण्यात आलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेल्या भागवत कराड यांना राज्यसभेवर तर रमेश कराड यांना विधान परिषदेवर घेण्यात आलं.
Ahmednagar : ‘आप्तेष्टांनी बेईमानी केली पण देवाने साथ दिली’; विखे-शिंदे वाद टोकाला
पुढे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात प्रीतम मुंडेंचं नाव पुढे येत असताना अचानक त्यांचा पत्ता कट करत भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. तर मुंडे गटाच्या पिंपरी- चिंचवड येथील उमा खापरे यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. यामुळे पंकजांना डिवचण्याची कुठलीही संधी फडणवीस यांनी सोडली नाही.
दुसरीकडे या स्पर्धेत असलेले विनोद तावडे आणि भाजपचे तत्कालीन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेही असेच मूळ प्रवाहापासून बाजूला झाले. यात विनोद तावडे यांनी काळाचे पाऊल ओळखत शांत राहण्यात समाधान मानलं. मात्र, आक्रमक स्वभावाचे खडसे शांत राहिले नाहीत. यानंतर खडसे यांच्यावरही अचानक घोटाळ्याचे आरोप होऊ लागले. आरोपाचे उत्तर देऊनही फडणवीस त्यांच्या मदतीला येत नव्हते, सातत्याने त्यांची कोंडी होत असल्याने खडसेंनाही नाविलाजाने भाजपला राम-राम करावा लागला. ते राष्ट्रवादीत दाखल झाले.
मुळात राम शिंदे हे पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. त्यात विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात सत्ता बॅलन्स करणे भाजपला अवघड होत आहे. उघड उघड निष्ठावंत असलेल्या आणि मुंडे समर्थक राम शिंदेंना डावलणं भाजपसाठी इतकं सोपं नाही. तर फडणवीसांच्या मर्जीतल्या विखेंचाही योग्य मानसन्मान करणं फडणवीसांपुढचं आव्हान आहे. त्यात जिल्ह्याच स्टेरिंग हे विखेंच्या हातात असावं, असं फडणवीसंना वाटू शकतं. मात्र, याला राम शिंदे अडथळा ठरत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच तर राम शिंदे यांना एकट पाडलं जात नाही ना, अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
विखेंशी पंगा घेण्याचे अनेकजण टाळतात… पण राम शिंदे थेट भिडतात ! ही आहेत कारणे…
दुसरीकडे माजी पालकमंत्री म्हणून काम पाहिलेले राम शिंदे यांची ताकद जामखेड मतदारसंघांमध्ये हळूहळू वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे विखेंसाठी हा चिंतेचा विषय असू शकतो. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे यांची वर्णी लागली तर जिल्ह्याचा सत्ता केंद्र बॅलन्स करणं अवघड होणार आहे. नेमके त्यामुळेच आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये खटके उडत आहेत, असाही एक मतप्रवाह आहे.
दरम्यान, काल माध्यमांशी बोलताना राम शिंदे म्हणाले की, पक्षात मला कोणी एकटं पाडायाचा प्रयत्न केला तरी मी भाजपच्या मुशीत वाढलेला कार्यकर्ता आहे. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला कितीही एकटं पाडलं तरी संघर्षातून पुढं जाईन. माझी विचारधारा मला योग्य ठिकाणी घेऊन जाईल, असं खुलं वक्तव्य शिंदे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावला जात आहे. यामुळे या मागचा खरा सूत्रधार कोण? याची मात्र, जोरदार चर्चा होत आहे.