“पाया पडून अजितदादांना सांगितलं पहाटेची शपथ घेऊ नका पण..”, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
प्रशांत गोडसे, शिर्डी
Dhananjay Munde : मी दादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका हे षडयंत्र आहे. पाया पडलो पण दादा म्हणाले काही होत नाही. सुनील तटकरे त्याला साक्षीदार आहेत. तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं, असा गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडे यांनी केला. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंडे पुढे म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून अजितदादांच्या प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभा राहिलो. पक्षाच्या वाईट काळात वेगवेगळी आंदोलने, यात्रा आदींच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. मात्र आता बीड जिल्ह्यातील एका दुर्दैवी हत्या प्रकरणा आडून मला जाणीवपूर्वक ठरवून टार्गेट केलं जात आहे. महायुतीतील नेत्यांकडूनच मला लक्ष्य केलं जात आहे. याचेच जास्त वाईट वाटत आहे. पक्षातील काही लोक देखील दादांच्या कानाला लागून चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. मात्र तरीही माझी भूमिका व वस्तुस्थितीची जाणीव असल्याने या कठीण काळातही पक्ष म्हणून दादा माझ्या पाठीशी उभे आहेत.
आज कुणी निराधार व बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकवण्याचा माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला तरीही उपयोग होणार नाही. कारण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे! अजित दादांनी आता बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे याचा आनंदच असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडी म्हणजे ना घरका, ना घाटका; पटेलांची एकाच वाक्यात व्याख्या..
बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात झालेली स्व.संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवले पाहिजे हे माझे पहिल्या दिवसापासून स्पष्ट मत आहे. मात्र या घटनेच्या आडून जात म्हणून एका समाजाला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जात आहे. सातत्याने आमची मीडिया ट्रायल केली जात आहे. याबद्दल धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली.
तर त्याला शिंगावर घेणारच
पक्षात आल्यापासून आजवरच्या वाटचालीत आमचे नेते म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहिलो. अनेक प्रसंगी अजितदादांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाला. तुमच्या अंगावर कोणी आले तर त्याला आम्ही शिंगावर घेतले. २०१४-१९ या काळात विरोधी पक्षनेतेपदी काम केलं. पक्षाच्या पडत्या काळात चार वेळा हल्लाबोल, परिवर्तन, शिवस्वराज्य यात्रांमध्ये सहभागी होऊन सबंध महाराष्ट्र पिंजून काढला. तत्कालीन सरकारला वाकवायचे काम केले. २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका हे मी सांगितले होते. ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडे यांनी आज प्रथमच बोलून दाखवली.
सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी चांगले काम करून दाखवले. गाव-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ यांसारखे अनेक क्रांतिकारी निर्णय त्याकाळात घेतले. ११ हजार कोटी रुपये पीकविमा एका वर्षात मिळवून देणारा कृषिमंत्री मी. मात्र त्यावरूनही टीका झाली. मात्र अर्धवट माहिती देऊन बदनामी करणारे लोक यावर बोलत नाहीत असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. त्यावेळी बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी जाऊ नकोस अन्यथा पुढे विधानसभेत त्याचा तुला त्रास होईल, असा सल्ला मला अनेकांनी दिला होता. मात्र तरीही मी गेलो. माझ्यासह अनेकांना विधानसभा निवडणुकीत ठरवून टार्गेट केले गेले. मी माझ्या परळीच्या जनतेच्या आशीर्वादाने एक लाख चाळीस हजार मतांच्या लिडने निवडून आलो, त्याचीच पोटदुखी अनेकांना प्रकर्षाने झाली. ठाण्यात मी पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराला गेलो म्हणून तिथले नेते बीडमध्ये येऊन मला टार्गेट करत आहे, हेही उघड झाले.
विधानसभा निवडणुकीत मी केवळ ५ दिवस पूर्णवेळ परळीत होतो, उर्वरित वेळेत मी पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, बैठका घेतल्या. त्यातील बहुतांश उमेदवार निवडून आले, असेही मुंडे पुढे बोलताना म्हणाले.