Dhangar Reservation : रोहित पवारांचा डबल अटॅक! विखेंना गुगली, राम शिंदेंना सुनावलं
Rohit Pawar : राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाचाही मुद्दा चर्चेत आला आहे. धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकण्यात आला. त्यानंतर नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणही करण्यात आले. या सगळ्या घडामोडींनंतर आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मंत्री विखे पाटील आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘मंत्रिपद नुसती भुषवायची नसतात’ : CM शिंदेंसमोरच अजितदादांनी घेतली मराठवाड्यातील मंत्र्यांची शाळा
आ. पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत शिंदे यांच्यावर टीका केली. रोहित पवार म्हणाले, धनगर आरक्षण सुटावे अशी इच्छाशक्ती राम शिंदे यांची नाही. चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाला भेट देण्यासाठी नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जाणार होते. परंतु त्यांनी अचानक आपला दौरा रद्द केला. या दौऱ्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, धनगर आरक्षणाचा मुद्दा सुटावा असं भाजप सरकारला वाटत नाही. खरं तर आंदोलनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच त्यांनी तेथे जायला हवे होते. पण, ते गेले नाहीत. कदाचित बिजी असतील. भाजपाचे माजी मंत्री हे त्याच गावचे असून त्यांच्या समाजाचे उपोषण सोडवण्यासाठी त्यांना एक मोठा मंत्री देखील आणता आला नाही ही शोकांतिका आहे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांना लगावला.
राधाकृष्ण विखे येतो म्हणाले पण, आलेच नाहीत
धनगर आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून चौंडी (Chaundi) येथे यशवंत सेनेचे कार्यक्रर्ते उपोषणाला बसले आहेत. आतापर्यंत सरकारने आपला कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मध्यस्थी करण्यासाठी चौंडीला जाणार होते. यासाठी त्यांचा दौराही ठरला होता. पण विखे पाटील यांचा दौरा अचानक रद्द झाला. अगोदरच नाराज असलेल्या धनगर समाजातील उपोषणकर्त्यांचा राग आणखी तीव्र झाला आहे. धनगर उपोषणकर्त्याकडे मात्र सरकारने पाठ फिरवल्याचे यातून दिसत आहे.