ठेवी 384 कोटींच्या अन् कर्ज वितरण 423 कोटींचे; मुरकुटेंशी निगडीत अशोक बँकेवर आरबीआयचे निर्बंध
Ashok Sahakari Bank: . पूर्वपरवानगीशिवाय बँकेला कोणतेही नवीन कर्ज किंवा आगाऊ रक्कम मंजूर अथवा नूतनीकरण करता येणार नाही.
Ashok Sahakari Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ने अहिल्यानगरमधील श्रीरामपूर येथील माजी आमदार भानुदास मुरकुटे (Bhanudas Murkute) यांच्या निगडीत अशोक सहकारी बँकेवर (Ashok Sahakari Bank) काही निर्बंध लागू केले आहेत. पूर्वपरवानगीशिवाय बँकेला कोणतेही नवीन कर्ज किंवा आगाऊ रक्कम मंजूर अथवा नूतनीकरण करता येणार नाही. तसेच नवीन गुंतवणूक करणे, कर्जाद्वारे निधी उभारणे, नव्या ठेवी स्वीकारणे, कोणत्याही प्रकारचे दायित्व निर्माण करणे किंवा देयकांची पूर्तता करणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
ठेवीदारांना पैसे काढता येणार नाहीत
बँकेच्या सध्याच्या तरलता स्थितीचा (Liquidity विचार करून आरबीआयने ठेवीदारांना बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून रक्कम काढण्यास मनाई केलीय. मात्र आरबीआयच्या निर्देशांमध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून ठेवींच्या रकमेतून कर्जाची रक्कम समायोजित करण्याची बँकेला परवानगी आहे.
ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण
पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवींवर कमाल 5 लाख रुपयांपर्यंतची ठेव विमा रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. ही रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) मार्फत, DICGC कायदा, 1961 मधील तरतुदींनुसार दिली जाईल. यासाठी संबंधित ठेवीदारांनी आपली संमती सादर करणे आणि आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे.
बँकेचा परवाना रद्द झालेला नाही
हे निर्बंध लागू केल्याचा अर्थ बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत, या निर्देशांमध्ये नमूद केलेल्या निर्बंधांच्या अधीन राहून बँकिंग व्यवसाय सुरू राहणार आहे.
माझे बँकेकडे दुर्लक्ष झाले-मुरकुटे
याबाबत बँकेचे सर्वेसर्वा व माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केलीय. अशोक बॅंकेबाबत काही ठेवीदारांनी आरबीआयकडे तक्रारी केल्या. काहींनी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या. त्यामुळे आरबीआयने बँकेवर निर्बंध लावले आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार सध्या बंद राहणार आहे. तरी पाच लाख रुपये ठेवी असणाऱ्यांना तीन महिन्यात व त्या पुढच्या रकमा असणाऱ्यांना सहा महिन्यात सर्व पैसे परत मिळतील. वसुलीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सीए असलो तरी अशोक बँकेच्या कारभारात मात्र नापास झालो असे मत बँकेचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केले. निश्चितपणे ठेवीदारांचे कष्टाचे पैसे आहेत आणि ते त्यांना परत देणे ही आमची जबाबदारी आहे. परंतु मागील काही काळामध्ये वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे माझे बँकेकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीला व्यक्तीशः मी स्वतः आणि बँकेचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहोत. यात संचालक मंडळाचा कोणताही दोष नाही असेही ते म्हणाले.
बँकेमध्ये 384 कोटी
बँकेमध्ये 384 कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज वितरण मात्र 423 कोटींचे झाले आहे .त्यामुळे सिडी रेशोमध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. कर्जदारांनी वेळेवर पैसे न भरल्याने थकबाकी वाढली. त्याचा परिणाम दैनंदिन व्यवहारावर झाला आहे .लोकांचे कष्टाचे पैसे असतात. त्यामुळे ते घाबरणे साहजिक आहे. अफवा पसरल्याने गर्दी झाली आहे.लोक एकदम पैसे घ्यायला आले. त्याचाही परिणाम झाला. आरबीआय ने सहा महिन्यांचे बंधन घातले आहे ही एक सामान्य बाब आहे.जिल्ह्यातील इतर बँकांवर देखील यापूर्वी अशी बंधने लावण्यात आली होती, मात्र ती सुरळीत झाली. अशोक बँक सुद्धा सहा महिन्यांमध्ये पूर्व पदावर येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नगर, पुण्यामध्ये कर्जदारांची संख्या मोठी
नगर आणि पुणे येथील कर्जदार सभासदांची संख्या मोठी असून नगरमध्ये दीडशे कोटीचे तर पुण्यामध्ये तीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. वसुलीसाठी बँकेने संबंधित सभासदांना नोटीस पाठवल्या असून वसुलीची प्रक्रिया पद्धत चुकीची असल्याने वेळखाऊ असल्याने त्याला वेळ लागत आहे . कर्जदारांना जप्तीच्या नोटीस दिल्याने ते नाराज झाले. काही लोकांनी गावात नकारात्मक चर्चा केली. आर्थिक दृष्ट्या मी खूप काळजीपूर्वक कारभार करीत असतो. मी कंजूसपणा करतो तो सभासदांना भावतो आणि म्हणून त्या विश्वासावर लोकांनी या बँकेत ठेवी ठेवलेले आहेत. परंतु कर्जवाटप ज्यादा झाल्याने व वसूल कमी झाल्याने बँक थोडी अडचणीत आहे. मात्र सहा महिन्यांमध्ये सर्व परिस्थिती सुरळीत होईल. तोपर्यंत सर्व सभासद ठेवीदार कर्जदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले . या वेळी अशोक बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.