अहमदनगरमध्ये एक हजार मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण
अहमदनगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन (CPAA) यांच्या संयुक्त विद्यमाने व SK AVAM चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून वय वर्ष 9 ते 18 वयोगटातील एक हजार गरजू मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक HPV लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम गुरुवारी, 10 ऑक्टोबर 2024 रोजी सारडा कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. (Rotary Club of Ahmednagar Priyadarshini in association with Cancer Patients Aid Association (CPAA) and SK AVAM Charitable Foundation Free cervical cancer preventive vaccination for one thousand girls)
गर्भाशयमुख कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक प्रमुख कर्करोग आहे. योग्य वेळी प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास तो पूर्णतः टाळता येऊ शकतो. HPV (Human Papillomavirus) लसही गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण करणारी प्रभावी लस आहे. ही लस मुलींना त्यांच्या बालपणी दिल्यास भविष्यातील कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या माध्यमातून एक हजार गरजू मुलींना मोफत लसीकरण करून त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी मोठा योगदान देण्यात येत आहे. ही मोहीम समाजातील गरीब कुटुंबांतील मुलींना लसीकरणाची संधी देत आहे. प्रत्येकी अडीच हजार रुपये किमतीच्या एकूण 25 लाख किमतीच्या लसी दिल्या जाणार आहेत.
लसीकरणासाठी नोंदणी आवश्यक
लसीकरणासाठी मुलींना पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्व नोंदणी केल्याशिवाय लसीकरण दिले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. नोंदणीसाठी पालकांचे संमतीपत्रासह मुलीचे आधार कार्ड व पिवळे किंवा केशरी शिधापत्रिकेची झेरॉक्स द्यावी लागेल.लसीकरणच्या पूर्व नोंदणी करीता आवश्यक अर्ज कापड बाजार येथील सिमरतमल कुंदनमल (SK) ज्वेलर्स येथे उपलब्ध आहे. पूर्व नोंदणीसाठीचे फॉर्म येथेच दिनांक 30 सप्टेंबर 2024 पूर्वी भरून जमा करावेत.
या मोफत लसीकरण मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मुलींमध्ये व पालकांमध्ये सदर कर्करोग व त्याचे दुष्परिणाम तसेच सदर लसीचे फायदे बाबत जनजागृती करणे कामी नगर शहरातील विविध शाळेत मार्गदर्शन पर शिबिर रोटरी प्रियदर्शिनीच्या सदस्य व प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ स्मिता तारडे यांच्या मार्फत घेण्यात येत आहेत.
या लसीकरण मोहिमेबद्दल बोलताना रोटरी क्लबच्या अध्यक्षा मिनल ईश्वर बोरा यांनी सांगितले की, “ही मोहीम मुलींना सुरक्षित व निरोगी भविष्य देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपला आजचा एक छोटा प्रयत्न आपल्या मुलीला कर्करोगापासून मुक्त करू शकतो. तसेच याकामी अधिक माहितीसाठी व कोणतीही मदत लागल्यास 9370776058, 982379999 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.