पाणीपुरवठा मंत्र्याच्या गावात प्यायला पाणी नाही; दानवेंचा गुलाबराव पाटलांवर घणाघात
Maharashtra Politics : जळगाव जिल्ह्याला तीन तीन मंत्रीपदं मिळाली पण, अजूनही विकासाची अनेक कामं बाकी राहिली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री येथीलच आहेत पण त्यांच्या गावात प्यायला सुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती आहे. हर घर जल म्हणता पण, नळांना तोट्या सुद्धा राहिल्या नाहीत. योजनांचा फक्त भ्रष्टाचारासाठीच वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता केली. जळगाव येथे आयोजित वचनपूर्ती सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.
‘सरदार पटेलांनीही संघावर बंदी घातली होती’; ठाकरेंची तोफ भाजप-आरएसएसवर धडाडली
दानवे पुढे म्हणाले, राज्य सरकार सगळ्याच आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये भाव मिळत होता. पण, हे करंटं सरकार आल्यानंतर कापसाचे भाव सात हजारपर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे आता आपल्याला परिवर्तनाची हाक द्यायची आहे आणि या परिवर्तनात जळगावकरांनाही सहभागी व्हायचे आहे, असे आवाहन दानवे यांनी केले.