अहिल्यानगर पेटले ! कोण जबाबदार ? एक-एक घटना कशा घडत गेल्या ?
Ahilyanagar: वेगवेगळे चार गुन्हे नोंदविण्यात आले असून, अनेकांना अटकही केली आहे. मुख्य शहरातील काही भागात रात्रीही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला

अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरामध्ये सोमवारी दोन धर्मियांमध्ये मोठा वाद झाला. त्यातून दगडफेकीचा प्रकार घडला. पोलिसांनी बळाचा वापर करत जमावावर लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या प्रकरणी वेगवेगळे चार गुन्हे नोंदविण्यात आले असून, अनेकांना अटकही केली आहे. मुख्य शहरातील काही भागात रात्रीही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांची (Police) गस्तही सुरू आहे. परंतु हा वाद कसा पेटला, कसा वाढत गेला हे पोलिस प्रशासनाकडून दिलेल्या माहितीवरून उघडकीस येत आहे.
सोमवारी शिवप्रतिष्ठानकडून दुर्गा दौडचे आयोजन आणि वाद
भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने सोमवारी सकाळी सात वाजता दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. माळीवाडा बसस्थानक येथील इम्पेरिअल चौक ते मंगलगेट देवी मंदिर या मार्गावर ही दौड होती. या दौडचे स्वागत करण्यासाठी माळीवाडा येथील बारतोटी कारंजा येथे आरती संग्राम रासकर व संग्राम आसाराम रासकर यांनी रांगोळी काढली होती. त्या रांगोळीमध्ये मुस्लिम धर्माचा भावना दुखविण्यासारखा प्रकार केला. हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर ती रांगोळी काढून टाकण्यात आली. परंतु त्याचवेळी अज्ञात लोकांनी त्यांचा व्हिडिओ मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये प्रसारित केला. त्यानंतर शेख अल्तमश सलिम जरीवाला यांच्या फिर्यादीवरून संग्राम रासकर व एक जण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. रासकरला अटक करण्यात आली होती.(Why did Ahilyanagar violence How did each incident happen?)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील रेकॉर्डब्रेक पाऊस, तब्बल ६८ मंडळांत अतिवृष्टी
मुस्लिम तरुणाकडून एकाला मारहाण
रांगोळी प्रकरणानंतर काही मुस्लिम युवक हे कोतवाली पोलिस स्टेशन समोर आले. त्या ठिकाणी प्रवीण खराडे हे मोटारसायकलची चावी बनविण्यासाठी उभे होते. त्याचवेळी हाच तो म्हणून काही जणांनी खराडेला मारहाण सुरू केली होती. त्याचवेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला. खराडे यांच्या फिर्यादीवरून दहा ते पंधरा युवकांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.
दौडच्या मार्गावर गोमांस टाकल्याप्रकरणी गुन्हा
दौड मार्गावर हाडाचे तुकडे व मांसाचे तुकडे टाकल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी देविदास भिमराव मुदगल यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला होता.
कोठल्यात जमाव पांगविण्यासाठी लाठीचार्ज
त्यानंतर मुस्लिम तरुणांचा जमाव कोठला येथे जमा झाला होता. पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कोठला येथेच रास्ता रोको सुरू केला. पोलिस अधिकारी यांनी जमावास रास्ता-रोको करू नये, अशी विनंती केली. परंतु जमाव आक्रमक झाला. तब्बल दीड तासा रास्ता रोको सुरू होता. त्याचवेळी जमावातील काही जण इदगाह मैदानाच्या दिशेने पळत सुटला. त्यातील काही जणांनाच्या हातात दगडे होते. त्यांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करत दगडफेक सुरू केली. त्यात पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. दंगल केल्याप्रकरणी दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रात्री पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू व मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व शांतता समितीचे सदस्य यांची बैठक झाली. अहिल्यानगर शहरामध्ये शांतता ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. तर शहरामधील संवेदनशील ठिकाणी व मिश्रवस्ती अशा ठिकाणी फिक्स पाँइट, पेट्रोलिंग नेमण्यात आलेली आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.