कथाकार, कादंबरीकार ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांचं निधन, अनेक राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

  • Written By: Published:
कथाकार, कादंबरीकार ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांचं निधन, अनेक राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

Novelist and writer R. R. Borade Passes Away : मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार ज्येष्ठ लेखक रा. रं. बोराडे यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी त्यांची लेखन शैली मराठी वाचकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. (R. R. Borade ) त्यांनी लिहिलेल्या ‘पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले होते.

नुकताच महाराष्ट्र शासनाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार ‘मराठवाडा साहित्य परिषदे’ला जाहीर करण्यात आला होता. तर मराठी साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीसाठी “विंदा करंदीकर जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला होता. तसेच त्यांना या आधी देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप या पुस्तकाचा अकादमीकडून सन्मान

रा. रं. बोराडे यांचा जन्म लातूर जिल्हा आणि तालुक्यातील काटगाव या गावी झाला. त्या काळी काटगाव हे अत्यंत मागासलेले खेडे होते. तेथे शाळाही नव्हती. खाजगी शिक्षक ठेवून मुलांना शिक्षण दिले जाई. रा.रं. बोराडे यांचे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण असेच खाजगी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाले. पाचवीसाठी त्यांना बार्शीला यावे लागले. बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये त्यांचे १०वीपर्यंतचे शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते सोलापूरला गेले. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी ते औरंगाबादला आले. तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मराठीमध्ये एम.ए. केले.

१९६३ साली रा.रं. बोराडे हे विनायकराव पाटील यांनी स्थापन केलेल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वैजापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७१पासून पुढे काही काळ ते त्या कॉलेजचे प्राचार्य होते. आपल्या कर्तृत्वाने वैजापूरसारख्या छोट्या गावाला त्यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक नकाशावर आणले. नंतर ते नामांकित समजल्या जाणाऱ्या औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य बनले. श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे प्राचार्य राहिलेले आहेत. २००० साली त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.

नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार रा.रं.बोराडे यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक प्रतिभासंपन्न लेखक गमावला आहे. त्यांच्या सर्जनशील लेखणीने ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू उलगडले, समाजमनाचा ठाव घेतला आणि वाचकांना अंतर्मुख केले. त्यांच्या कथांमधील वास्तवदर्शी चित्रण, धक्कादायक शेवट आणि मराठवाडी बोलीतील सहज संवाद यामुळे त्यांचे साहित्य वाचकप्रिय ठरले त्यांना आदरांजली – मंत्री उदय सामंत

नुकताच रा.रं.बोराडे यांना मराठी साहित्यातील भरीव कामगिरी केल्याबद्दल भाषा विभागातर्फे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांना एका दिमाखदार सोहळ्यात देण्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र दुर्दैवानं त्याआधीच ते आपल्याला सोडून गेले. केवळ साहित्यिकांनाच नव्हे तर त्यांना ओळखणारे सर्वसामान्य लोक, त्यांचे चाहते असलेल्या विद्यार्थ्यांना देखील बोराडे सरांच्या जाण्यानं निश्चितपणे आज धक्का बसला आहे – उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे

“प्राचार्य रा. रं. बोराडे हे ग्रामीण साहित्याचे सशक्त आणि प्रभावी लेखक होते. त्यांच्या लेखणीतून साहित्य रसिकांना ग्रामीण जीवनाचे खरेखुरे चित्र पाहायला मिळाले. ‘पाचोळा’, ‘चारापाणी’, ‘मी आमदार सौभाग्यवती’ यांसारख्या कादंबऱ्यांतून आणि विविध कथासंग्रहांतून त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्न, संघर्ष आणि जीवनशैलीला जिवंत केले. मागच्याच आठवड्यात त्यांना राज्य शासनाचा ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला होता. मात्र, त्या सन्मानाचा स्वीकार करण्याआधीच त्यांचे निधन होणे हे अत्यंत दुःखद आहे. – अजित पवार उपमुख्यमंत्री

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या