गरीब जनतेचा श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘गोड’ होणार : शिंदे सरकार वाटणार ‘आनंदाचा शिधा’

गरीब जनतेचा श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा ‘गोड’ होणार : शिंदे सरकार वाटणार ‘आनंदाचा शिधा’

मुंबई : गणेशोत्सव, दिवाळीप्रमाणाचे आता श्रीराम प्राणप्रतिष्ठा ( Shri Ram Pranpratistha) सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील पात्र नागरिकांना प्रति शिधापत्रिका पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (10 जानेवारी) याबाबतच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. पुढील आठवड्यापासून या शिध्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. (On the occasion of Shri Ram Pranpratistha celebration and Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti state will be given anandacha shidha)

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे, तर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. राज्यात गरीब जनतेने हे दोन्ही उत्सव आनंदाने साजरे करावेत, गोडाचे जेवण करावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय या बैठकीत इतरही काही महत्वाच्या निर्णयाांना मान्यता देण्यात आली.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत पात्र रेशनकार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये गणपती आणि दिवाळी अशा सणांमध्ये गतवर्षीपासून आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. गतवर्षी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला होता. दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ 100 रूपयांना देण्यात आला होता.

त्यापूर्वी पार पडलेल्या गौरी-गणपतीतही रेशनकार्डधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर खाद्यतेल या चार गोष्टींचा समावेश असलेला आनंदाचा शिधा रेशनकार्डवरुन ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये या दराने दिला होता. आता श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीती सर्व निर्णय :

● राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
(महिला व बालविकास)

● ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी.
(ग्राम विकास विभाग)

● शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.
(वित्त विभाग)

● ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी.
(वित्त विभाग )

● जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी.
(दिव्यांग कल्याण विभाग)

● पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता.
(ग्राम विकास विभाग)

● महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार.
(मदत व पुनर्वसन विभाग )

● राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी.
(अन्न व नागरी पुरवठा)

● राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे तसेच त्यांचेसाठी सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्याबाबत व ५८०३ बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्याबाबत.
(विधी व न्याय विभाग)

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज