फुटलेल्या खासदारांचा पक्षप्रवेश कधी?, शिवसेनेच्या वर्धापनदिनीच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देणार
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडत आहे.
ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे (Shinde) यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची माहिती आहे. हे सर्व खासदार दिल्लीत दाखल झाले असून आज लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटून ते शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे पत्र देतील, अशी शक्यता आहे. मात्र, या सहा खासदारांचा पक्षप्रवेश आज नव्हे तर 19 जून रोजी मुंबईतील शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापनदिन 19 जून रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडत आहे. हा मेळावा भव्यदिव्य करण्यासाठी सध्या शिंदेंच्या गोटात जोरदार तयारी सुरु आहे. याच वर्धापनदिन मेळाव्यात ठाकरे गटाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या गुप्त गाठीभेटी सुरु होत्या.
शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंसोबत जाणार; बंड करण्याचे महत्वाचे कारणं आले समोर
या खासदारांच्या गटाला अधिकृतरित्या मान्यता मिळण्यासाठी ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बाहेर पडणे आवश्यक होते. या अटीची पूर्तता झाल्यानंतरच एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील फुटीर खासदार दिल्लीला गेल्याची माहिती आहे. या बंडखोर खासदारांच्या गटाला केंद्रातील एक मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी आपले सहा खासदार फुटणार हे स्पष्ट झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन शिंदे गटावर टीका केली होती.
फुटीर खासदारांना 15 कोटी रुपयांचा अॅडव्हान्स देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र पाठवून फुटीर खासदारांच्या गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणीचे पत्र पाठवले होते. यावर आता लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.