तिसऱ्यांदा वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले; वाचा, राज्यात कुठं कुठं पंप बंद?
कॅन तसेच बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल देऊ नये, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे पाठ फिरवत या पंपावर कॅनमध्ये डिझेल दिलं जात असल्याचे पाहायला मिळालं.
राज्यात इंधनाचा मोठा तुटवडा झाला आहे. (Petrol) प्रत्येक जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीपासूनच लोक रांगेत उभे आहेत. पेट्रोल पंपावरच मुक्काम करत आहेत. दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या रांगा पेट्रोल पंपावर लागल्या आहेत. शेतकऱ्यांनाही डिझेल मिळणं मुश्कील झालं आहे. तर काही ठिकाणी लोक ड्रम, कॅनमधून पेट्रोल घेऊन जाताना दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठाही केला जात आहे. राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर इंधनच नसल्याने हे पेट्रोल पंप बंद झाले आहेत.
सहा पेट्रोल पंप बंद
जळगाव शहरातील व शहरालगतच्या सात पेट्रोल पंपांवरील काल रात्री 12 वाजल्या नंतरच्या परिस्थितीचा आढाव आमच्या प्रतिनिधीने घेतला. मोहाडी रोड परिसर, डी मार्ट शेजारी, राष्ट्रीय महामार्ग लगत मास्टर कॉलनी, नेरी नाका परिसर, पांडे चौक, दक्षता पेट्रोल पंप आणि कोझी कॉटेज पेट्रोल पंप या सात ठिकाणच्या पेट्रोल पंपांची आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली. सातपैकी सहा पेट्रोल पंपांवर पेट्रोल डिझेल शिल्लक नसल्याने नो स्टॉकचे फलक लावण्यात आल्याचे पाहायला मिळालं. एक पंप सुरू होता त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.
पेट्रोल डिझेल शिल्लक नसल्यामुळे सहा पेट्रोल पंप पूर्णपणे बंद होते. कर्मचारी पंपावर पहारा देत बसलेला असल्याचा पाहायला मिळाला. राष्ट्रीय महामार्गालगत ओम साई इंदू रमेश या पेट्रोल पंपावर 12 वाजेनंतर देखील पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. ओम साई इंदू रमेश पेट्रोल पंपावर एकीकडे चार चाकी वाहनांच्या रांगा होत्या. तर दुसरीकडे मोठ मोठ्या कॅन घेऊन नागरिक रांगेत उभे होते. तिसरीकडे दुचाकीधारकांची गर्दी होती.
कॅन तसेच बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल देऊ नये, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे पाठ फिरवत या पंपावर कॅनमध्ये डिझेल दिलं जात असल्याचे पाहायला मिळालं. एवढ्या रात्री 40-50 किलोमीटरवरून काही शेतकरी देखील कॅन घेऊन या पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगेत उभे होते. दिवसभर ठिकठिकाणचे पेट्रोल पंप फिरून देखील डिझेल मिळालं नाही. तसेच कोणाला दवाखाना तर कोणाला गावी जाण्यासाठी आवश्यक असल्याने चारचाकी वाहन रांगेत उभे होते. दिवसा तसेच रात्री पेट्रोल डिझेलसाठी शोधाशोध करावी लागूनही डिझेल मिळत नसल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील पातुर परिसरातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल आढळून आले नाही. तर अनेक पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे बोर्ड सुद्धा लावण्यात आले आहेत. बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात जी परिस्थिती आहे, तीच अकोला जिल्ह्यात नसल्याचं आढळून आलं आहे.
राज्यभरात डिझेल टंचाईचं संकट गडद होत असताना त्याचा परिणाम आता अकोला जिल्ह्यातही दिसून येत आहे. पेट्रोल पंप तर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. बाळापूर येथील जिओ पेट्रोल पंपावरही डिझेलचा साठा संपल्यामुळे पंप बंद ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याच्या अनेक भागात डीझेल अभावी परिस्थिती अधिक गंभीर होताना दिसत असून अनेक पेट्रोल पंपावर कॅनच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहे.
डिझेलसाठी शहरात धाव
गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर तिसऱ्यांदा वाढले आहेत. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल 90 पैशाने तर डिझेल 95 पैशाने महागले आहे. अहिल्यानगरमध्ये आज पेट्रोल 108.87 रुपये तर डिझेल 95.47 रुपये दराने मिळत आहे. तसेच शेतकऱ्यांना ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही. त्यामुळे शहरी भागात येऊन डिझेल ड्रममध्ये घेऊन जावे लागत आहे.
कॅनसह डिझेलसाठी पेट्रोल पंपावर
वाशिम जिल्ह्यात आज सलग नवव्या दिवशीही डिझेल तुटवड्याची समस्या कायम असल्याचं चित्र आहे. प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी दिसत आहे. वाशिम शहरातील दक्षता पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या कॅनसह डिझेलसाठी दाखल होत असून लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. प्रशासनाने डिझेल वितरणासाठी नवीन नियमावली आणि आवश्यक कागदपत्रांची अट जाहीर केली आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांनी रात्रभर कॅनला नंबर लावून प्रतीक्षा केली असताना आता आवश्यक कागदपत्रे कुठून आणायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. शेतीची कामे सुरू असताना शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
पेट्रोल द्या पेट्रोल द्या, नाहीतर पेट्रोल पंप बंद करा
जळगावच्या मुक्ताई नगरमध्ये पेट्रोल पंप मिळत नसल्याने ग्राहकांचा संयम सुटला होता. पेट्रोल द्या नाही तर पेट्रोल पंप बंद करा… अशा घोषणाच यावेळी ग्राहकांनी दिल्या. पंपावर शिस्त नसल्याने इंधन पुरवठा देणे थांबवल्याचं द्वारका पेट्रोल पंपाच्या मालकाने सांगितलं. पेट्रोल पंपावर चेंगराचेंगरी होत आहे, ढकलाढकली होत आहे. पोलीस प्रशासनाला माहिती देऊ नाही कुठली मदत होत नाही, असंही त्याने सांगितलं.
शेतकऱ्यांच्या रांगा कायम
वाशिम जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा कायम असून काल मध्यरात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या रांगा कायम होत्या. शहरातील माऊली पेट्रोल पंपावर काल सायंकाळी 4 वाजल्यापासून रांगेत असलेल्या 200 ते 300 शेतकऱ्यांना रात्री साडेबारा वाजल्या नंतरही डिझल मिळाले नाही. त्यामुळं काही शेतकऱ्यांनी पंपावरच मुक्काम ठोकला असून जोवर डिझल मिळत नाही, तोवर पंपावरून जाणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
झोपायलाच जागा नाही, झोपायचे कुठे?
डिझेलसाठी आपला नंबर लागेल, या आशेपोटी शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह बुलढाणा ते चिखली रस्त्यावरील दांडगे यांच्या पंपावर रांगेत लागले होते. काल रात्री दीड वाजता पंप बंद होते. मात्र सकाळी टँकर येणार आणि आपला नंबर लागून आपल्याला डिझेल मिळणार, अशी आशा त्यांना होती. शेती मशागतीची कामे करायची आहेत, म्हणून डिझेल मिळावे. ते सुद्धा कॅनमध्ये मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनि केलीय. रात्रभर हे लोक पेट्रोल पंपावर बसून होते. काही लोकांनी ट्रॅक्टरवर बसून रात्रभर गप्पा मारणं पसंत केलं. तर काहींनी पेट्रोल पंपावरच झोपा काढली. गर्दी एवढी होती की झोपायला जागाही मिळत नव्हती. त्यामुळे अनेकांचा संताप झाला. झोपायलाच जागा नाही, तर झोपायचे कुठे? असा सवाल शेतकरी करत होते.
रात्रीचं जेवण रस्त्यावरच
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली शहरातील रेणुका पंपाबाहेर शेतकऱ्यांनी काल दुपारी 3 वाजता ट्रॅक्टर घेऊन रांग लावली. मात्र रात्री 9 वाजता मुजोर पंप मालकाने पंप बंद करून टाकला आणि अनेकांना उघड्यावर रात्र काढण्याची वेळ आणली. डिझेल स्टॉक असतानाही शेतकऱ्यांना रात्रभर ताटकळत ठेवले. एका पंपावरून दुसऱ्या पंपावर, असे करत करत नंबर लावणे सुरू आहे. मात्र तरीही डिझेल मिळाले नाही. काहींनी रस्त्यावर बसून जेवण केले तर काहीजण उपाशीच होते. कारण 10 ते 15 किलोमीटर अंतरावरून आलेलेलं शेतकरी कुठे जेवणार? हॉटेलही बंद होत्या. त्यामुळे सर्वजण रस्त्यावरच गप्पा मारत बसले होते.
ट्रॅक्टरच्या खुर्चीलाच बनवला बेड
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथील चिखली ते जालना रस्त्यावरील रेणुका पेट्रोल पंपाच्या बाहेर अक्षरश: शेतकरी डिझेलसाठी फुटपाथवर झोपले होते. कुणी ट्रॅक्टरच्या खुर्चीलाच झोपण्याचे बेड बनवले, कुणी ट्रॅक्टर बोनेटवर झोपले होते. काहींनी जेवण केले, काही शेतकरी उपाशीच होते. पाण्याची तर कुठेच व्यवस्था नव्हती. जर डिझेल मिळाले नाही तर पेरणी कशी करायची, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यामुळे डिझेल मिळवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे.