छत्रपती संभाजीनगरात गोरक्षकासह पोलिसांवर जमावाचा हल्ला; आरोपींमध्ये ५ महिलांचा समावेश
मांसाची तस्करी होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्यावरून केंब्रिज चौकात मांस वाहून नेणारी रिक्षा पकडली.

छत्रतपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. (Sambhajinagar) येथे प्रतिबंधित जनावरांच्या मांसाची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून धाव घेतलेल्या गोरक्षक व पोलिसावर महिला, तरुण व अल्पवयीन मुलांच्या २० ते २५ जणांच्या जमावाने शस्त्र, लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. यात गणेश आप्पासाहेब शेळके (२४, रा. पळशी) हा गंभीर जखमी झाला. तर, त्याच्यासोबतच्या पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की करत गणवेश फाडण्यात आला आहे.
शहरातील केंब्रिज चौकात प्रतिबंधित मांसाची तस्करी होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्यावरून केंब्रिज चौकात मांस वाहून नेणारी रिक्षा पकडली. त्याच दरम्यान दुसरी रिक्षा सुमारास चिकलठाण्यातील पुष्पक गार्डन परिसरात गेल्याचे त्यांना कळले. पोलीस अंमलदार अंकुश ढगे, गणेशने त्या दिशेने धाव घेतली. गोरक्षक व पोलीस आल्याचं कळताच मांस तस्कर संतप्त झाले व त्यांनी जमाव जमवून दोघांवर हल्ला चढवला. चाकू, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्याने वार करत गणेशला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ढगे यांना धक्काबुक्की केली. ढगे यांनी त्याही परिस्थितीत गणेशला जमावाच्या तावडीतून सोडवत दुचाकीवरून रुग्णालयात भरती केलं.
ब्रेकिंग : धनुष्यबाण चिन्ह अन् शिवसेना पक्षाबाबत SC कोर्टात 12 नोव्हेंबर रोजी होणार फैसला
पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. रात्री उशिरापर्यंत चिकलठाण्यात कडेकोट बंदोबस्त तैनात होता. रात्री उशिरा संशयित इसा कुरेशी, फेरोज कुरेशी, उजेफ कुरेशी व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. आरोपींमध्ये ५ महिलांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी गंभीर दखल घेत तीन गुन्हे दाखल केले. गणेशच्या जबाबावरून जमावावर हत्येचा प्रयत्न, मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार ढगे यांच्या तक्रारीवरून याच जमावावर सरकारी कामात हस्तक्षेपाचा, तर केंब्रिज चौकातील मांस पकडल्याचा तिसरा गुन्हा दाखल केला.
या हल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या. गणेशची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दिवसभर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. सायंकाळी हिंदू संघटनांची बैठक झाली. बैठकीत आज क्रांतीचौकात सकाळी १०:३० वाजता या घटनेविरोधात तीव्र निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला. शिवाय, मांस तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यासाठी संघटनांकडून पोलिसांना आठ दिवसांचा अल्टीमेटम देण्यावरही चर्चा झाली. मनपा मुख्यालयाजवळ काहींनी कत्तलीसाठी जनावरे आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यामधील सात जनावरांची सुटका करत आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी इश्तियाक अहेमद कुरेशी बाबुमिया कुरेशी, शेख साबेर शेख हुसेन याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.