विमाननगरमधील पबवर पोलिसांची धाड; बेकायदा पार्टी करणाऱ्या 50 जणांना घेतलं ताब्यात
बेकायदा पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; 50 जण ताब्यात; 3 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
Police raid pub in Vimannagar : विमाननगर परिसरातील एका पबमध्ये बेकायदा सुरू असलेल्या पार्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी पहाटे मोठी कारवाई केली. या कारवाईत महिला व पुरुष अशा सुमारे 50 जणांना ताब्यात घेण्यात आले असून पब मालकासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एअरपोर्ट रोडवरील ‘द नॉयर (रेड जंगल)’ या पबमध्ये ही कारवाई करण्यात आली. अधीक्षक अतुल कानडे(Atul Kanade) यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली. छाप्यात 178 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून एकूण 3 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विमाननगर(Vimannagar) परिसरात कोणताही अधिकृत परवाना न घेता पार्टी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती अधीक्षक कानडे यांना मिळाली होती. त्यानंतर तातडीने पथकाने छापा टाकला. कारवाईच्या वेळी पबमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असून मद्यसेवन सुरू असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी पब मालक अमरजित सिंग संयु याच्यासह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 52 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी पब चालक व व्यवस्थापक असे दोन आरोपी सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या छाप्यात अवैध मद्य व्यवसायासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात खुर्च्या, सोफा, लाकडी टी-पॉय, लोखंडी साहित्य, स्पीकर्स, साऊंड सिस्टीम, लॅपटॉप, संगणक, काचेचे ग्लास, फॉग मशीन आदींचा समावेश आहे. यावरून पबमध्ये नियोजित पद्धतीने बेकायदा पार्टी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र नियम डावलून सुरू असलेल्या अशा बेकायदा पार्ट्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे शहरात 21 भरारी पथके तैनात करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. परवाना नसताना मद्यविक्री किंवा पार्टी आयोजन करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही,” असा इशाराही कानडे यांनी दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदा पब आणि अवैध मद्य व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून येत्या काळात आणखी धडक कारवाया होण्याची शक्यता आहे.
