प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत खोटी माहिती दिली, हक्कभंग प्रकरणात सुषमा अंधारे भडकल्या

Sushma Andhare On Prasad Lad : हक्कभंग नोटीस प्रकरणात आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेमध्ये खोटी माहिती दिली असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाते उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे. त्यांनी याबाबत फेसबुकवर (Facebook) एक पोस्ट लिहित आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रसाद लाड यांनी आज पुन्हा एकदा सभागृहाच्या पटलावर खोटी माहिती दिली आहे. मला हक्कभंगाची नोटीस बजावणे हा आपल्या प्रक्रियेचा भाग निश्चितच असू शकतो. आपण तशी नोटीस काढण्याला माझी काहीच हरकत नाही. ती नोटीस आल्यावर त्याला यथावकाश उत्तर देण्याची ही माझी तयारी आहे किंवा त्या संबंधाने सभागृहाची जी कुठली कारवाई असेल त्या कारवाईला सामोरे जाण्याची ही माझी तयारी आहे. मात्र या सबंध प्रक्रियेच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा आपण सभागृहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हक्कभंग नोटीस देण्यासाठी माझ्या घरी गुन्हे शाखेचे पोलीस आले ही माहिती आमच्या पक्षाचे नेते तथा विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य अनिल परब यांनी प्रश्न विचारला की, “अशा पद्धतीने हक्कभंगाची नोटीस बजावण्यासाठी आठ पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी घरी जाणे योग्य आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना आपण सभागृहाला खोटी माहिती दिली की, “आपण जे काही केले आहे ते प्रक्रियेनुसार केले आहे. आपण कुठल्यातरी पत्त्यावर नोटीस पाठवली आणि तिथे मी आढळून आले नाही. जर असे कधी घडले तर संबंधित व्यक्तीच्या जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या करवी नोटीस पाठवली जाते.””म्हणून आपण माझ्याकडे पोलीस पाठवले.”
प्रसादजी, हक्कभंग समितीला माझ्या नोटीशीचे काय उत्तर द्यायचे आणि त्यावर जे काही होईल त्याला सामोरे जायचे असे संविधानाचा आदर करणारी व्यक्ती म्हणून मी ठरवले आहे. कारण मला संविधानाची चाड आहे. मात्र आपण कधीच खरं बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे का? आपला खोटारडेपणा पुढील मुद्द्यांवरून स्पष्ट होतो.
मुद्दा क्रमांक 1
आपण म्हणालात की कुठल्यातरी एका पत्त्यावर आपण नोटीस पाठवली आणि त्या पत्त्यावर मी आढळून आले नाही. प्रसादजी आपला विवेक आणि प्रज्ञा शाबूत असेल तर आपण खरेच हे माध्यमांच्या समोर स्पष्ट करावे की, आपण नेमकी कोणत्या पत्त्यावर मला नोटिस पाठवली आहे. जिथे मी आपल्याला आढळून आले नाही. कारण माझ्याकडे येणारी सर्व प्रकारची पत्रे अगदी भीमा कोरेगाव प्रकरणातल्या नोटिसा असतील किंवा वेगवेगळ्या निमित्ताने माझ्याकडे बंदोबस्तासाठी येणारे पोलीस कर्मचारी या सगळ्यांना तोंडी लेखी सगळ्या पद्धतीने माझा पत्ता माहित आहे. माझे काही आपल्यासारखे किंवा आपल्या ओळखीत असणाऱ्या सत्ताधारी पक्षातल्या आमदार मंत्र्यांसारखे कुठेही फार्महाऊस, अनधिकृत बंगले, हॉटेल्स किंवा इतर कुठली मालमत्ता नाही. त्यामुळे माझा पत्ता सगळ्यांना अगदी व्यवस्थित माहीत असतानाही चुकीच्या पत्त्यावर पत्र गेले. ही चूक माझी आहे की पत्र पाठवणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची आहे.
मुद्दा क्रमांक दोन
आपण म्हणालात की, आपण संपूर्ण प्रक्रिया कायद्यानुसार पार पाडलेली आहे. जे पत्र माझ्या घरी अतिजलद पोस्टाने येऊ शकेल किंवा विधिमंडळाचा एखादा कर्मचारी घेऊन येऊ शकेल किंवा गरज पडल्यास एखादा पोलीस कर्मचारी सुद्धा घेऊन येऊ शकेल त्यासाठी आपल्याला मुंबईहून खास पोलीस टीम पाठवण्याची गरज का बर पडली आणि हे आपल्या कुठल्या प्रक्रियेत बसते?आपण सभागृहाला सांगताना म्हणालात की, संबंधित जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना बोलून आपण ती नोटीस पाठवण्याची तजवीज करता. मग माझ्या प्रकरणात नोटीस बजावण्यासाठी आपण चक्क मुंबईहून स्पेशल टीम तेही गुन्हे शाखेची पाठवण्याचे नेमके कारण काय?
मुद्दा क्रमांक तीन
भारतीय संविधानातील घटनात्मक तरतुदीनुसार एखादी व्यक्ती उपस्थित नसेल आणि तिच्या रक्तसंबंधातील नातेवाईक असतील व ते अशी एखादी नोटीस घ्यायला तयार असतील तर ती नोटीस त्यांच्याकडे सुपूर्द केली जाते. माझ्या सख्खा भाऊ नोटीस घ्यायला तयार होता. माझ्या वकिलांनी स्वतः संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून नोटीस घेण्यासंदर्भात पुढाकार घेतला तरी सुद्धा आपण ती नोटीस का दिली नाही?
मुद्दा क्रमांक चार
हक्कभंगाची नोटीस देण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्यांचे असणे सुद्धा पुरेसे आहे. त्यासाठी आपल्याला चक्क मुंबईवरून API दर्जाच्या अधिकाऱ्यांसह आठ लोकांची टीम का पाठवावीशी वाटली आणि हे आपल्या कुठल्या घटनात्मक तरतुदीत बसते याबद्दल आपण बोलाल का?
मुद्दा क्रमांक पाच
आपण जाणीवपूर्वक दबाव तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न केला. अर्थात तो आपला प्रयत्न अत्यंत निष्फळ ठरणारा आहे. कारण एवढ्या तेवढ्या कारणावरून घाबरणे हा माझा स्वभाव असता तर मोदी शाह आणि एकूण आपण सगळे यांनी सुरू केलेल्या हुकूमशाहीच्या विरोधात इतक्या बिनदिकतपणे मी माझी लढाई चालू ठेवली नसती.
मुद्दा क्रमांक सहा
सभागृहाची दिशाभूल करताना आणि सभागृहाला खोटी माहिती देत असताना, आपण चक्क विषय भरकटवत नेला आणि सुषमा अंधारे यांनी आधी काय वक्तव्य केली वगैरे बघा असे म्हणालात. याचा अर्थ स्पष्ट आहे की, आपला हेतू एक कायद्याची प्रक्रिया पार पाडणे हा नाही तर एनकेन प्रकारे सुषमा अंधारे या व्यक्तीला अडचणीत आणण्यासाठी वाटेल त्या प्रकारे प्रयत्न करणे आहे. प्रसादजी तब्बल 27 वर्षांपूर्वीच्या एका वाढदिवस स्पर्धेतील अत्यंत अस्पष्ट व्हिडिओचा आधार घेत आपण चक्क वंदनीय बाळासाहेबांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करत आहात. प्रसादची हक्कभंगाची नोटीस ही बाळासाहेबांच्या संदर्भातील आहे की एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील आहे? विशेष, वंदनीय बाळासाहेब बद्दल आपल्याला केव्हापासून आपुलकी वाटायला लागली? कारण ज्या बाळासाहेबांनी रक्ताचं पाणी करून आणि हाडाचं कार्य करून शिवसेना वाढवली घडवली ती शिवसेना संपवणे आपला मूळ उद्देश आहे असे आपल्या पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा ऑन रेकॉर्ड म्हणाले त्यावेळी आपल्याला बाळासाहेबांच्या बद्दलची आपुलकी आणि कळवळा आठवला नाही का? असो यावर मी फार लिहू बोलू शकते पण तूर्तास इतकेच.
वरील सगळ्या मुद्द्यांचा नीट अभ्यास केल्यास महाराष्ट्राच्या लक्षात येईल की मुळात कायद्याची प्रक्रिया पार पाडायची म्हणून तुम्ही हा आटापिटा केला नाही तर जाणीवपूर्वक हेतूपुरस्सर माझ्यावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न होता.पण प्रसादजी माझ्यावर दबाव यायला माझे काही एखादा इडीच प्रकरण आहे का? किंवा माझ्या कुटुंबातलं कोणी एखाद्या लाचखोरीच्या प्रकरणामध्ये अडकलेला आहे का ज्याला वाचवण्यासाठी मला भाजपला शरण जावे लागेल? समितीचे अध्यक्ष म्हणून आपण पाठवलेल्या नोटिसीला अत्यंत रीतसर उत्तर देणे ही माझी जबाबदारी असेल आणि मी ती पार पाडेल.
Sanjay Gaikwad : राऊतांवर टीका करता गायकवाडांची जीभ घसरली, म्हणाले, “संजय राऊतच्या..”
मी आजवर कायद्याचा आदर करत आलेली आहे आणि तो यापुढेही माझ्याकडून केला जाईल कारण कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. मात्र यानिमित्ताने एकूणच आपल्या पक्षाचा खोटारडेपणा आणि विरोधक जेव्हा कुठल्याच आपल्या दडपशाहीला भिक घालत नाही तेव्हा त्याच्या संबंधाने संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न राज्यातील जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. असं सुषमा अंधारे, उपनेते तथा प्रवक्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.