धो धो पावसातही चिपळूण सुरळीत ठेवणारे प्रसाद शिंगटे आता बदलणार फुरसुंगीचं रूपडं

Prasad Shingte Transferred : धो धो पावसातही चिपळूण पूराचा फटका बसू न देता जनजीवन सुरूळीत ठेवणारे तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आता पुण्यातील फुरसंगीचं रूपडं पालटणार आहे. प्रसाद शिंगटे यांची फुरसुंगी उरुळी देवाची मुख्याधिकारीपदी बदली करण्यात आली असून, सध्या ते मिरा भाईंतर महानगरपालिकेत उपायुक्त पदावर कार्यरत होते. मीरा-भाईंदरचे विद्यामान उपायुक्त असताना शिंगटे यांनी तरूणांना रोजगार मिळवून देण्याबरोबरच MBMC शाळांमध्ये एका शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 65 टक्क्यांवरून 90 टक्क्यांपर्यंत नेले होते.
चिपळूनच्या आपत्ती व्यवस्थापनेची झाली होती जोरदार चर्चा
दरवर्षी कोसळणाऱ्या पावसात चिपळूनमध्ये पूरस्थिती निर्माण होत होती. २०२१ मध्ये शहरात महाप्रलयकारी पूर आला होता. ढगफुटी हे महापुराचे कारण असले तरी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागावरही खापर फोडण्यात आले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या आपत्ती व्यवस्थापनेचा पॅटर्नची जोरदार चर्चा झाली होती. तसेच हा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
स्वच्छ सर्वेक्षणात चिपळूनने मारली होती बाजी
आपत्ती व्यावस्थापनेचा पॅटर्न राबविणाऱ्या शिंगटे यांच्या कार्यकाळात चिपळूण नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात 2023 मध्ये कोकणात प्रथम क्रमांक पटकावला होता. तर, देशात चिपळून नगर पालिका 10 व्या स्थानी होती. या काळात शहरातील कचऱ्याचे विभाजन करून बायोगॅस प्रकल्पही शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला होता.
ब्रेकिंग : पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग; भाजप पदाधिकारी कोंढारेला अटक
गेल्या काही वर्षांपासून कचरा डेपोच्या प्रश्नावरून फुरसुंगीतील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनेकादा कचरा प्रश्न गंभीर झाल्याचे चित्र पुणे शहरात निर्माण झाले होते. अद्यापही यावर ठोस असा मार्ग काढण्यात यश आलेले नाही. मात्र, आता चिपळून चकाचक करणारे आणि धो धो पावसातही चिपळूनचे जनजीवन सुरळीत ठेवणारे तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांची बदली आता फुरसुंगी उरुळी देवाची मुख्याधिकारीपदी करण्यात आली आहे. त्यामुळे शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली फुरसुंगीचा कचरा डेपोचा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल असे बोलले जात आहे.