बस स्थानक, एसटी बस आणि प्रीपेड ऑटो रिक्षेबाबत मंत्री सरनाईकांकडून महत्त्वाचे निर्देश

Pratap Sarnaik reviews and gives instructions regarding bus stations, ST buses and prepaid auto rickshaws : विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे प्रीपेड रिक्शा सुरू करणेबाबत तसेच नाशिक, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामकाजाचा आढावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री गजानन किर्तीकर, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (प्रभारी) विवेक भीमनवार, नाशिक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा येरवडातील मुक्काम वाढला; जामिनावर 20 मार्चला सुनावणी होणार
परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे. त्यामुळे अदानी समूह व परिवहन विभागाच्या समन्वयातून येत्या दोन महिन्यांत प्रिप्रेड रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात. ते म्हणाले की,या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभरित्या प्रवासी सुविधा उपलब्ध होणार असल्याने विमानतळाचे व्यवस्थापन पहाणाऱ्या अदानी समुहाने परिवहन विभागाच्या सहकार्याने १ जुन पासून प्रिप्रेड रिक्षा सेवा सुरू करावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी सेवा सक्षम करण्यासाठी लवकरच मिडी बसेस उपलब्ध करून देणार!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बोलताना मंत्री राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग डोंगराळ, दुर्गम जिल्हा असून एस टी बस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे बस सेवा सुरळीतपणे चालू रहावी व प्रवाशांची गैरसोय टाळून सुलभ रित्या त्यांना एसटी बसची सेवा मिळावी, या साठी भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी परिवहन मंत्री सरनाईक यांच्याकडे केली. त्यांच्या या मागणीला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानक व बस गाड्यांच्या विविध अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
पुढील एक महिन्यात नाशिकचे मेळा बसस्थानक सर्व समस्या मुक्त झाले पाहिजे!
नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी निवेदन सादर केले. प्रसाधनगृहे, बसस्थानक व परिसर अत्यंत अस्वच्छ असून नवीन बांधलेल्या मेळा बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. या बाबतीत संबंधित एसटीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात व येथे एक महिन्यांमध्ये संपूर्ण बसस्थानक समस्या मुक्त करावे असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.तसेच आमदार फरांदे यांच्या मागणीनुसार महामार्ग बसस्थानकाचा विकास सिंहस्थ निधीतून करण्याबाबत शासन स्तरावर विचार करण्यात येईल. तसेच मेळा बसस्थानकाच्या समस्यांवरही सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.