मोठी बातमी : पुणे, खडकीसह सात कॅन्टोंन्मेंट बोर्डांचा महापालिकांत समावेशाच्या हालचाली

  • Written By: Published:
मोठी बातमी : पुणे, खडकीसह सात कॅन्टोंन्मेंट बोर्डांचा महापालिकांत समावेशाच्या हालचाली

पुणे : कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मोठा निर्णय होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सात कॅन्टोन्मेंट बोर्ड रद्द होणार असून त्यांचा समावेश नजिकच्या महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे. यासाठीचा अभिप्राय राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने संबंधित महापालिकांकडून मागविण्यात आला आहे. या कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या निवडणुका मध्यंतरी जाहीर करण्यात आल्या होत्या. पण त्या रद्द झाल्या. त्यामागचे कारण आता पुढे आले आहे. केंद्र सरकारने देशभरातील हे कॅन्टोंन्मेंट बोर्ड रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय या आधी घेतला होता. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे.

या निर्णयाचे राजकीय परिणाम देखील होण्याची शक्यता आहे. राज्यातील सात महापालिकांची संभाव्य वाॅर्ड रचना देखील या निर्णयामुळे बदलू शकते. राज्य सरकारने याबाबत संबंधित महापालिका आय़ुक्तांकडून अभिप्राय मागविले आहेत. त्यानुसार बोर्डाचे क्षेत्र, लोकसंख्या, यांचा समावेश महापालिकेत झाल्यानंतर शहराची लोकसंख्या कितीने वाढणार याबाबतचा तपशील तातडीने मागवला आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशिला पवार यांनी यासंबंधीचे पत्र २७ मार्च रोजी पाठविले आहे. यासाठीचा अभिप्राय तात्काळ देण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने याबाबत आधी दिलेल्या पत्राचा हवाला यात देण्यात आला आहे.

संबंधित प्रस्तावानुसार कोणते कॅन्टोंन्मेंट बोर्ड कोणत्या महापालिकेत समाविष्य होऊ शकते ते पुढीलप्रमाणे

पुणे कॅन्टोंन्मेंट- पुणे महानगरपालिका

खडकी कॅन्टोनेंट- पुणे महानगरपालिका

देहू कॅन्टोन्मेंट- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड- नाशिक महानगरपालिका

अहमदनगर कॅन्टोंन्मेंट बोर्ड (भिंगार)- अहमदनगर महानगरपालिका

औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड- औरंगाबाद महानगरपालिका

कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड- नागपूर महानगरपालिका

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube