जेलमधून बाहेर येताच जंगी पार्टी; विशाल अग्रवाल कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट

मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो… या लोकप्रिय हिंदी गाण्यावर संपूर्ण कुटुंब जल्लोषात नाचताना दिसत आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 100

Vishal Agarwal family video goes viral : पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. भरधाव वेगातील आलिशान पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुण आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केवळ पुणेच नव्हे तर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. अल्पवयीन मुलाच्या हाती कोट्यवधींची सुपरकार कशी दिली गेली? त्याला पबमध्ये दारू कोणी दिली? आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? अशा अनेक प्रश्नांनी संपूर्ण यंत्रणेलाच हादरवून सोडले होते. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, तुरुंगाबाहेर आल्यानंतर अग्रवाल कुटुंबाने केलेल्या कथित जल्लोषामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे अग्रवाल कुटुंब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या व्हिडिओमध्ये विशाल अग्रवाल आणि त्यांच्या पत्नीने गळ्यात नोटांचे मोठे हार घातलेले दिसत आहेत. मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो… या लोकप्रिय हिंदी गाण्यावर संपूर्ण कुटुंब जल्लोषात नाचताना दिसत आहे. पार्टीमध्ये मोठ्या आवाजात संगीत, पैशांचे प्रदर्शन आणि उत्सवी वातावरण स्पष्टपणे दिसत असल्याने नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या व्हिडिओला संवेदनाहीनतेचा कळस असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना अजूनही न्यायाची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत आरोपी कुटुंबाकडून सार्वजनिकरित्या जल्लोष केला जात असल्याचा आरोप होत असल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पैशांच्या जोरावर कायदा आणि समाजाची खिल्ली उडवली जात आहे का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. काहींनी तर या प्रकरणात न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश निश्चित, मिळणार विधानपरिषदेची उमेदवारी; ‘या’ दिवशी करणार पक्ष प्रवेश

कल्याणीनगर अपघात प्रकरणात सुरुवातीपासूनच अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. अल्पवयीन आरोपीला अवघ्या काही तासांत जामीन मिळाल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही समोर आला. या प्रकरणात ससून रुग्णालयातील काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे हे प्रकरण केवळ अपघातापुरते मर्यादित न राहता संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेशी जोडले गेले होते.

दरम्यान, आता समोर आलेल्या या पार्टीच्या व्हिडिओमुळे अग्रवाल कुटुंबाच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. जेलवारी घडूनही माज कायम, पैशांचा अहंकार अजून उतरलेला नाही अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा एक प्रश्न समोर आला आहे. तो म्हणजे गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या प्रभावशाली व्यक्तींना समाजात वेगळे नियम लागू होतात का? आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अजून किती संघर्ष करावा लागणार? पुण्यातील या हायप्रोफाइल प्रकरणाकडे आता पुन्हा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us