निवडणूक आली की एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी का ठरते अनिवार्य? भाजप-शिवसेना संघर्षामागचं मोठं राजकारण
शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत असून त्यात एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवाऱ्या वाढल्या आहेत.
The big politics behind the BJP-Shiv Sena clash : महाराष्ट्रात निवडणुका जवळ आल्या की दोन गोष्टी हमखास चर्चेत येतात, एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी आणि दुसरी म्हणजे थानायत शिवसेना-भाजपमधील वाढणारी रस्सीखेच. सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाण्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजप आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. पण प्रश्न असा आहे की, निवडणूक आली की भाजप ठाण्यावर दावा करते? यामागे नेमकी कोणती राजकीय पार्श्वभूमी आहे.
याचं उत्तर दडलंय ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात. आजचा ठाणे मतदारसंघ आणि 2009 पूर्वीचा ठाणे मतदारसंघ यामध्ये मोठा फरक होता. 2009 पूर्वी ठाणे हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ मानला जायचा. त्यावेळी कल्याण-डोंबिवली हाही भाग ठाणे मतदारसंघातच समाविष्ट होता. 1962 मध्ये स्थापन झालेल्या या मतदारसंघातून सुरूवातीला काँग्रेसचे सोनुभाऊ बसवंत निवडून आले. मात्र त्यानंतर जनता पक्ष आणि भाजपचा या मतदारसंघावर प्रभाव वाढत गेला. भाजपचे ज्येष्ठ नेते राम कापसे आणि रामभाऊ म्हाळगी यांच्यासारख्या नेत्यांनी ठाण्यात भाजपची मजबूत पायाबभरणी केली.
मात्र 1996 ची लोकसभा निवडणूक हा या मतदारसंघासाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्यावेळी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा ठोकला. मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची ताकद ठाणे जिल्ह्यात झपाट्याने वाढत होती. महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक भाजपपेक्षा अधिक असल्याने ठाण्यावर शिवसेनेचाच नैसर्गिक हक्क असल्याची भूमिका आनंद दिघेंन्नी घेतली.
हीच भूमिका पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी देखील उचलून धरली. युती टिकवण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी अखेर ठाण्याची जागा शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेतला. विद्यमान भाजप खासदार असताना देखील ही जागा सेनेला द्यावी लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. त्यावेळी राम कापसे यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं, पण भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या मनात ठाण्याची जागा गमावल्याची सल कायम राहिली.
जेलमधून बाहेर येताच जंगी पार्टी; विशाल अग्रवाल कुटुंबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट
यानंतर 1996 ते 2004 या काळात शिवसेनेचे प्रकाश परांजपे सलग चार वेळा ठाण्यातून निवडून आले. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व अधिक मजबूत झालं. पुढे 2008 नंतर राजकीय समीकरणं बदलली. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ठाणे आणि कल्याण असे दोन स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ तयार झाले. पण नव्याने तयार झालेला कल्याण मतदारसंघ देखील शिवसेनेकडे गेला आणि 2014 पासून श्रीकांत शिंदे तिथून खासदार आहेत. ठाण्यात देखील शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले.
दरम्यान 2014 नंतर भाजपने महाराष्ट्रात मोठी राजकीय ताकद निर्माण केली. ठाण्यासारख्या कधीकाळी स्वतःचा प्रभाव असलेला जिल्हा पुन्हा आपल्या ताब्यात आणण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू झाला. शिवसेनेतील फुटीनंतर भाजपला त्यात आणखी मोठी संधी दिसली. 2024 च्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक ठिकाणी उघड संघर्ष दिसून आला.
आज ठाणे जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर भाजपकडे संख्याबळ जास्त असल्याचं चित्र आहे. भाजपचे रवींद्र चव्हाण, संजय केळकर. गणेश नाईक, मंद म्हात्रे, नरेंद्र मेहता यांसारखे प्रभावी नेते जिल्ह्यात सक्रिय आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने देखील ठाण्यात आपला मजबूत प्रभाव कायम ठेवला आहे. कोपरी-पाचपाखाडीपासून कल्याण आणि भिवंडीपर्यंत शिवसेनेचे आमदार आणि खासदार अजूनही प्रभावी मानले जातात.
Byju’s च्या संस्थापकाला 6 महिन्यांचा कारावास अन् 70,000 डॉलर्सच्या दंडाची शिक्षा; सिंगापूर न्यायालयाचा मोठा निर्णय
लोकसभेचे चित्र पाहिलं तर ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील काही महापालिकांवर शिवसेनेचं तर काहींवर भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सत्ता आणि वर्चस्वाची लढाई अजून देखील कायम आहे. राजकीय जाणकारांच्या मते, भाजपसाठी ठाणे हा केवळ एक जिल्हा नाही, तर गमावलेला राजकीय वारसा आहे. आणि म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत ठाण्यावर दावा करण्याचा प्रयत्न भाजपकडून पुन्हा-पुन्हा केला जातो. दुसरीकडे शिवसेनेसाठी ठाणे म्हणजे आनंद दिघेंची परंपरा आणि एकनाथ शिंदे त्यांची राजकीय ताकद. त्यामुळे आगामी काळात देखील ठाण्यातील शिवसेना-भाजप संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.