पुणे विद्यापीठाच्या उत्तर पत्रिका खरंच पावसात भिजल्या का? विद्यार्थ्यांचा आरोप अन् प्रशासनाचे उत्तर
Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा एक धक्कादायक प्रकार सोमवारी (30 मार्च) उघडकीस आला. शहरात झालेल्या
Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा एक धक्कादायक प्रकार सोमवारी (30 मार्च) उघडकीस आला. शहरात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे विद्यापीठाच्या गोदामात ठेवलेल्या लाखो उत्तरपत्रिका भिजल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोपांवर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने उत्तर दिले आहे.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद (आठवले गट) यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत म्हटले की, “वर्षभर अभ्यास करून विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका अशा प्रकारे उघड्यावर किंवा असुरक्षित ठेवणे, हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याशी खेळ आहे. या निष्काळजीपणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे आयुष्य अंधारात ढकलले जात आहे.”
यामुळे गोदामातील संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा विद्यापीठात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानंतर ‘त्या’ रद्दीतील उत्तरपत्रिका असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांनी अधिकृत पत्रकाद्वारे खुलासा केला की ”विद्यापीठ अध्यादेशानुसार, निकाल जाहीर झाल्यानंतर आणि पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठराविक कालावधीने उत्तरपत्रिका निकाली (निरस्त) काढल्या जातात. या उत्तरपत्रिका रद्दीत काढण्यासाठी संबंधित ठेकेदाराला निर्देश देण्यात आले होते. संकलित करून विल्हेवाट लावण्याचे काम सुरू असतानाच अचानक पाऊस आल्याने काही उत्तरपत्रिका भिजल्या. प्रशासनाने स्पष्ट केले की, ज्या उत्तरपत्रिका भिजल्या आहेत, त्यांचे मूल्यमापन आधीच पूर्ण झाले असून विद्यार्थ्यांच्या निकालावर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
अमोल खताळांच्या अडचणीत वाढ, आमदारकी रद्द होणार? थोरातांची याचिका न्यायालयाने स्वीकारली
दरम्यान, जरी प्रशासन या उत्तरपत्रिका ‘निरस्त’ असल्याचे सांगत असले, तरी लाखो उत्तरपत्रिका पावसात भिजताना पाहून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकालाची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी उत्तरपत्रिकांची विल्हेवाट लावताना योग्य काळजी का घेतली गेली नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. विद्यार्थी संघटना आपल्या मागणीवर ठाम असून, आता विद्यापीठ प्रशासन यावर काय ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.