Irshalwadi : मंदिरात गेम खेळत बसलेली मुलं ठरली देवदूत; त्याच मोबाईलवरुन मागितली मदत

Irshalwadi : मंदिरात गेम खेळत बसलेली मुलं ठरली देवदूत; त्याच मोबाईलवरुन मागितली मदत

रायगड : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याच्या घटनेत आतापर्यंत 80 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. साधारण 50 ते 60 घरं असलेल्या या गावात अंदाजे 250 लोकं राहत असल्याची माहिती आहे. यातील अजून साधारण 100 ते 125 लोकं अडकले असल्याचं सांगितलं जात आहे.  बचावकार्य युद्धपातळीवर  जखमींवर आधी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं जात आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. (Raigad-khalapur-irshalwadi-landslide-some-childern-alert-to-system)

दरम्यान, आजूबाजूच्या गावातील आणि स्थानिक युवकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली. गावातील मंदिरात गेम खेळत बसलेल्या 5 मुलांकडून याबाबतची माहिती समजली. त्यांनीच मोबाईलवरुन प्रशासनाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर साडे बारापर्यंत हे युवक घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय पोलीस, रुग्णवाहिका आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या युवकांनी वरती जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीची वेळ असल्याने पोलीस युवकांना वरती सोडतच नव्हते.

रातोरात शासनही घटनास्थळी दाखल :

युवकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच रातोरात शासनही घटनास्थळी दाखल झाले. एक ते दीड वाजण्याच्या सुमारास स्थानिक आमदार महेश बालदी कार्यकर्त्यांना घेऊन तिथं आले. त्यांच्यासोबत युवकांनी मध्यरात्रीच ट्रेक सुरु केला. त्यानंतर मध्यरात्री दोन ते अडीचच्या दरम्यान,  पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहचले. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहचले.

प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला थरकाप उडविणारा प्रसंग :

महिला म्हणाली, ‘बुधवारी रात्री मोठा पाऊस सुरू होता. वाराही सुटला होता. आम्ही घरातच होतो. अचानक बाहेर काहीतरी मोठा आवाज झाला. आम्हाला वाटलं की एखादं घरच पडलं आहे. पण, बाहेर येऊन पाहिलं तर अख्खं गावच ढिगाऱ्याखाली दबलं गेलं होतं. आमच्या शेजारील काही घरेही दबली गेली होती. त्यानंतर आम्ही आरडाओरडा करू लागलो. घरातील सदस्यांना घेऊन पटकन बाहेर पडलो.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube