‘न्यू माहिम स्कूल’ पाडू देणार नाही, मुंबई मनपा शाळेचा दर्जा सुधरवणार, राज ठाकरेंचं आश्वासन
समितीच्या वतीने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेची पाहणी राज ठाकरेंनी केली. पुस्तिकेचा उद्देश आणि त्यातील तपशीलाची माहिती गिरीश सामंत यांनी दिली.
राज्यभरातून तिसऱ्या भाषेच्या सक्तीला टोकाचा विरोध (Raj Thackeray) झाल्यानंतर डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती पुन्हा तिसऱ्या भाषेची/हिंदीची सक्ती करण्याची चूक करणार नाही, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना व्यक्त केला.
मराठी अभ्यास केंद्र व शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या आणि गिरीश सामंत आणि डॉ. प्रकाश परब यांनी संपादित केलेल्या ‘पहिलीपासून हिंदी/त्रिभाषासक्तीचे महाराष्ट्रद्रोही राजकारण (२०२५)’ या पुस्तिकेची प्रत भेट देण्यासाठी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची आज भेट घेतली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या शिष्टमंडळामध्ये अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, पुस्तिकेचे संपादक शिक्षण अभ्यासक गिरीश सामंत आणि कृती समन्वय समितीचे कार्यवाह आनंद भंडारे यांचा समावेश होता.
समितीच्या वतीने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेची पाहणी राज ठाकरेंनी केली. पुस्तिकेचा उद्देश आणि त्यातील तपशीलाची माहिती गिरीश सामंत यांनी दिली. या पुस्तिकेच्या सॉफ्ट कॉपी लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे चिन्मयी सुमीत यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मराठी शाळा आणि मराठी भाषाविषयक मुद्द्यांचा जाहीरनाम्यात अनिवार्यपणे समावेश करावा, ही आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर महाराष्ट्रातील शहरांवर मराठी भाषा, संस्कृतीचा छाप दिसेल अशा गोष्टींचा अंतर्भाव जाहीरनाम्यात करायचा असून त्यासाठी मराठी अभ्यास केंद्र तसेच शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने मुद्दे सुचवावेत अशी सूचना राज ठाकरे यांनी केली आहे.
कोकणी माणसावर उबाठाचे बेगडी प्रेम, दीपक केसरकरांचा हल्लाबोल
त्यानंतर समितीचे कार्यवाह आनंद भंडारे यांनी मुंबईतील ठरवून बंद पाडलेल्या / पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांच्या अनेक प्रकरणांचे सादरीकरण मनसे पक्षप्रमुखांसमोर केले. माहिममधील ‘न्यू माहिम स्कूल’ ही शाळा जबरदस्तीने पाडायला घेतलेली आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली. मराठी शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचे दाखवून त्या जबरदस्तीने पाडून तिथे दहा-बारा मजली इमारती होणार आहेत. त्यातून मराठी शाळांची मैदाने तर जाणार आहेतच. पण त्या इमारतींमधील वर्ग खाजगी आणि व्यावसायिक कारणांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसंच त्या शाळा सीबीएसई माध्यमांच्या करणार असल्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा इथून पुढे नष्ट करण्यात येणार आहेत. ज्या गोष्टी मुंबई महानगरपालिका मुंबईमध्ये करते त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या इतर महानगरपालिकाही करतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर शहरांमधूनही मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या जाणार आहेत. या गंभीर समस्येची जाणीव मराठी समाजाला करून देण्यासाठी रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत राजर्षी शाहू सभागृह, तिसरा मजला, श्री शिवाजी मंदिर, दादर (प), मुंबई येथे मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठरवून बंद पाडलेल्या / पाडल्या जाणाऱ्या मराठी शाळांसाठीची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेबद्दल मनसे पक्षप्रमुखांना सविस्तर माहिती देण्यात आली.
जबरदस्तीने ‘न्यू माहिम स्कूल’ ही मराठी शाळा पाडू दिली जाणार नाही, असे आश्वासन याप्रसंगी राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला दिले. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेत सत्ता आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा उत्तम दर्जाच्या करून दाखवेन. तसेच मराठी शाळांच्या परिषदेला पक्षाच्यावतीने प्रतिनिधी उपस्थित राहतील, असा शब्द मनसेप्रमुखांनी शिष्टमंडळाला दिला.
