अण्णा हजारे यांच्या समाजसेवा आणि राष्ट्रकार्याचा गौरव; भारतीय सैन्याकडून राळेगण सिद्धीला ऐतिहासिक टी-55 रणगाडा भेट
भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि देशभक्तीचा साक्षीदार असलेला हा रणगाडा आता राळेगण सिद्धी गावाची नवी ओळख बनणार आहे.
Ralegan Siddhi receives historic T-55 tank : महाराष्ट्रातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या राळेगण सिद्धीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या समाजसेवा, ग्रामविकास आणि राष्ट्रसेवेच्या कार्याचा गौरव म्हणून भारतीय संरक्षण मंत्रालय आणि भारतीय सैन्याकडून राळेगण सिद्धीला ऐतिहासिक टी-55 रणगाडा भेट देण्यात आला आहे.
या सन्मानामुळे लष्करी गौरव प्राप्त करणारे राळेगण सिद्धी हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. भारतीय सैन्याच्या शौर्याचा आणि देशभक्तीचा साक्षीदार असलेला हा रणगाडा आता गावाची नवी ओळख बनणार आहे. टी-55 रणगाडा हा केवळ युद्धसामग्री नसून भारताच्या लष्करी इतिहासातीलएक महत्वाचा अध्याय आहे. भारतीय सैन्याच्या अनेक निर्णायक मोहिमांमध्ये या रणगाड्याने सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे त्याचे राळेगण सिद्धीत आगमन हे गावासाठी अभिमानास्पद मानले जात आहे.
हा रणगाडा गावात आणण्यासाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे नोडल अधिकारी चंद्रकांत शिंदे यांनी या उपक्रमात महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्यासोबत लेफ्टनंट जनरल आर. आर. निंबोरकर (निवृत्त) आणि दादा पठारे यांनी संरक्षण मंत्रालय, भारतीय सैन्य आणि विविध शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून हा उपक्रम यशस्वी केला.
महायुतीचा विधान परिषद निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार
विशेष म्हणजे, अण्णा हजारे भारतीय सैन्यात कार्यरत असताना याच प्रकारच्या रणगाड्यांचा वापर विविध युद्ध मोहिमांमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे या रणगाड्याचे अण्णांच्या जीवनाशी देखील एक भावनिक आणि ऐतिहासिक नाते जोडले गेले आहे. देश-विदेशातून राळेगण सिद्धीला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच तरुण पिढीसाठी हा रणगाडा प्रेरणास्थान ठरणार आहे. भारतीय सैन्याचे शौर्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हा रणगाडा प्रमुख दर्शनीय स्थळी स्थापित करण्यात येणार आहे.
दरम्यान, रशियन बनावटीचा ‘टी-55’ रणगाडा 1960 साली भारतीय सैन्यात दाखल झाला होता. तब्बल 51 वर्षे देशसेवा बजावल्यानंतर 2011 मध्ये त्याला सन्मानपूर्वक निवृत्त करण्यात आले. भारत-पाकिस्तान युद्धासह 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात या रणगाड्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. रणभूमीवर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा रणगाडा आता राळेगण सिद्धीतून देशभक्तीची प्रेरणा देणार आहे.