शिंदेंची स्थानिक रणनीती की फडणवीसांचा ग्रीन सिग्नल? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखेंना शह देण्याची रणनीती
Ahilyanagar District Bank Election राम शिंदे पालकमंत्री असतानाही जिल्हा बँकेच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र...
Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढत्या सक्रियतेची आहे. आतापर्यंत बँकेच्या राजकारणापासून तुलनेने दूर राहिलेले शिंदे यावेळी मात्र स्वतंत्र भूमिका घेत असल्याचे दिसत असून, त्यांची ही खेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकीय शह देण्यासाठीच आहे का, याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
पहिल्यांदाच थेट मैदानात
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायट्यांचे ठराव जवळपास पूर्ण झाले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापल्या गटानुसार ठराव मंजूर करून घेतले आहेत. मात्र, यावेळी विशेष बाब म्हणजे प्रा. राम शिंदे यांच्या नावाचे दोन ठिकाणांहून ठराव झाल्याने त्यांनी या निवडणुकीत प्रत्यक्ष रस घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वतंत्र पॅनलची चाचपणी?
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे स्वतंत्र पॅनल उभारण्याच्या तयारीत असून त्यासाठी त्यांनी जिल्हाभर भेटीगाठींचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे या भेटी केवळ भाजपपुरत्या मर्यादित नसून विरोधी पक्षातील नेत्यांपर्यंतही पोहोचल्या आहेत. अलीकडेच त्यांनी पाथर्डीतील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे आणि भाजप आमदार मोनिका राजळे यांची भेट घेतली. त्यानंतर ते संगमनेरमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक बाजीराव खेमनर यांची भेट घेणार आहेत. तसेच राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशीही उद्या (दि.19) भेटीचे नियोजन असल्याचे सांगितले जात आहे.
विरोधकांशीही वाढलेला संवाद
राम शिंदे यांचे भाजपमधील आमदार विवेक कोल्हे यांच्याशी चांगले संबंध आहेतच; मात्र खासदार नीलेश लंके यांच्याशीही त्यांचे सुसंवाद असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे ते जिल्हा बँकेसाठी व्यापक राजकीय समीकरणे जुळवत असल्याची चर्चा आहे.
विखेंना शह की वरिष्ठांचा ग्रीन सिग्नल?
राम शिंदे पालकमंत्री असतानाही जिल्हा बँकेच्या राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र, गेल्या वर्षभरात त्यांनी बँकेच्या घडामोडींमध्ये रस वाढवला आहे. पारंपरिकरीत्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक नेत्यांची समीकरणे महत्त्वाची मानली जातात. अशा परिस्थितीत शिंदे यांनी सुरू केलेल्या हालचालींमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या राम शिंदे यांच्या या हालचाली केवळ स्थानिक पातळीवरील आहेत की त्यांना वरिष्ठ नेतृत्वाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, या हालचालींमुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न होत असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत.