Ramdas Kadam : उद्धव ठाकरे यांना व्याजासकट उत्तर देणार, शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही
काल तुम्ही जो महाराष्ट्राच्या जनतेसमोर तमाशा केला, त्याच व्याजासकट उत्तर येत्या १९ तारखेला मिळेल, अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल खेडमध्ये सभा घेतली, त्याला उत्तर देण्यासाठी रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
योगेश कदम यांचा जो अपघात झाला त्याची अजून चौकशी चालू आहे. रामदास कदम राजकारणातून संपवून तुम्ही थांबला नाहीत, तुम्ही योगेश कदम यालाही राजकारणातून संपवायला निघाला. येत्या १९ तारखेला उदय सामंत याची माहिती देणार आहेत. स्वतःच्या पक्षच्या आमदाराला संपवायचं पाप तुम्ही केलं, अशी टीका केली.
हेही वाचा : Nana Patole : ‘भाजप हा फक्त काही उद्योगपतींचा पक्ष’, पटोलेंचा भाजपवर निशाणा
उद्धव ठाकरे जेव्हा अयोध्येला गेले होते, तेव्हा अयोध्येची सगळी व्यवस्था मी केली होती. पण जायच्या आधी ऐनवेळी मला उद्धवजींनी मला बोलावून सांगितलं, तुम्ही येऊ नका. मला मीडियासमोर जाण्यास बंदी केली. माझ्या जाहीर सभेंना बंदी घातली. असा आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
काल उद्धव ठाकरे यांनी रामदार कदम हे केशवराव भोसले यांच्या घरात ड्रायव्हर होते, अशी टीका केली होती. त्यावर जर मी केशवराव भोसले यांच्या घरी ड्रायव्हर होतो, हे सिद्ध केले तर मी तुमच्या घरी भांडी घांसेन नाहीतर तुम्ही माझ्या घरी भांडी घासा असे आव्हान कदम यांनी दिले आहे.
शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही
शिवसेना उभी करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले आहेत, हे उद्धव ठाकरे यांनी माहित नाही. बाळासाहेब ठाकरे गेल्यांनतर शिवसेना नावाच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा मीच मालक आहे, असं तुम्ही वागू लागला. शिवसेना खासगी मालकी आणि खासदार, आमदारांना नोकर समजत होतात. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
१९ तारखेला एकनाथ शिंदे यांचीही जाहीर सभा
उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यांनतर एकनाथ शिंदे यांचीही खेडमध्ये सभा होणार आहे. मंत्री उदय सामंत यांनी एक ट्विट करून याची माहिती दिली. सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि “शिवसेनेचे मुख्यनेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे १९ मार्चला खेड (रत्नागिरी) मध्ये.. शिवसेनेची जाहीरसभा.. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर.. कितीही आदळआपट करा योगेश कदमच आमदार.”
शिवसेनेचे मुख्यनेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे १९ मार्चला खेड (रत्नागिरी) मध्ये.. शिवसेनेची जाहीरसभा.. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर.. कितीही आदळआपट करा योगेश कदमच आमदार.
— Uday Samant (@samant_uday) March 5, 2023
त्यामुळे येत्या काळात कोकणच्या राजकारणातच मोठी उलथापालथ पाहायला मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.