आपल्याला महायुतीत दंगा नको; एकनाथ शिंदे यांची ‘त्या’ वक्तव्यावरून धंगेकरांचे कान टोचले
गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकरांची कानउघडणी केल्याचं समोर आलं आहे. (Pune) कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर धंगेकरांनी थेट आरोप केल्याने हे प्रकरणा तापलं होतं.महायुतीत दंगा नको असा सल्ला एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना दिला. त्याचवेळी पुण्यातील गुंडांना पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिलं.
गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धंगेकरांच्या बॉसशी बोलतो असं म्हटलं होतं. त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी आपण स्वतः शिंदेंची भेट घेऊ आणि बाजू मांडू अशी भूमिका घेतली. पुण्यातील एका कार्यक्रमात रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली.
रवींद्र धंगेकरांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीत दंगा नको असं रवींद्र धंगेकरांना सांगितलं. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्यांना कोणताही त्रास होता कामा नये अशी भूमिका रवींद्र धंगेकरांनी मांडली होती. त्यावर आपण पुण्याला गुन्हेगारी मुक्त करू, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन दिलं. त्यावर पुण्याचे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.
सरकार म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणे आमचं काम आहे. सर्वसामान्यांना कोणताही त्रास होता कामा नये अशीच आमची भूमिका आहे. तसंच, पुण्यातील गुंडगिरीला पाठीशी घातलं जाणार नाही. गुन्हेगारांना क्षमा नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच, महायुतीत दंगा नको असंही शिंदे म्हणाले.