सांगली जिल्हा बँक गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी
सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणाला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. मात्र, ही स्थगिती एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारने नुकतीच हटविली आहे. जिल्हा बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे लेखी आदेश सहकार विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर यांनी सहकार आयुक्तांना काढले आहेत.
सध्याच्या सरकारने बँकेच्या कारभाराची पुन्हा चौकशीचे आदेश दिल्याने जयंत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरतीपासून अन्य व्यवहारात गैरव्यवहाराचे आरोप होत आहे. बँकेतील नोकर भरतीतील घोटाळा, कर्ज वाटपातील अनियमितता, बँकेच्या कामकाजातील गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
या बँकेतील गैरव्यवहाराबाबत स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार चौकशीचे पुढील आदेश देण्यात आले आहेत. याच चौकशीला गत मविआ सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये स्थगिती दिली होती.
पुन्हा दोन महिन्यांपूर्वी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सहाकार मंत्री सावे यांना भेटून ही स्थगिती उठविण्याची मागणी केली. शिंदे-फडणवीस सरकारातील अधिकारी वाडेकर यांनी पुन्हा चौकशी करण्याचे आदेश काढले. ही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक जयंत पाटलांकडे असल्याने तिच्या चौकशीला एवढे महत्त्व देण्यात आले आहे.