शेअर बाजार प्रकरणात शेवगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद?; गुंतवणूकदारांकडून रास्ता रोको आंदोलन

शेअर बाजार प्रकरणात शेवगाव पोलिसांची भूमिका संशयास्पद?; गुंतवणूकदारांकडून रास्ता रोको आंदोलन

Share Market Scam : शेअर बाजारात (Share Market) जास्त परताव्याचे आमिष दाखवून शेवगाव (Shevgaon) तालुक्यातील अनेक गुंतवणूकदारांचे विश्वास संपादन करत गुंतवणूकदारांची मोठी रक्कम घेऊन दीड महिन्यांपूर्वी चापडगाव येथील कार्यालयाला टाळे ठोकून फरार झालेला शेअर ट्रेडर रविवारी 16 रोजी सायंकाळी गावाकडे येणार असल्याची खबर गुंतवणूकदारांना मिळाल्याने गुंतवणूकदारांनी त्याच्यावर पाळत ठेवून त्याला पकडले आणि शेवगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

यावेळी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार अर्जही दाखल केला. मात्र पोलिसांनी थातूरमातूर करून, त्याला रात्री उशिरा सोडून दिले. त्यामुळे संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी शेवगाव गेवराई राजमार्गावर एक तासभर रास्ता रोको आंदोलन करून, शेवगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविला आहे.

दरम्यान शेअर मार्केट ट्रेडिंग प्रकरणाबाबत 40 ते 50 जणांनी पोलीस ठाण्यात दाखल होऊन शेवगाव पोलिसांची कृती संशयास्पद असल्याची तक्रार पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या समोर तक्रार केली. पोलिसांनी संबंधिताला सोडून दिल्यावर त्याने अनेकांना धमकावले, असे नागरिकांचे म्हणणे होते. यावेळी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी त्याच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही, त्यामुळे त्याला ताब्यात ठेवण्याचा अधिकार नसल्याचे सांगून, उलट आम्ही तुम्हाला त्यांना पैसे द्यायला सांगितले होते का? असा प्रश्न उपस्थित करून गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठांची परवानगी नाही, असे सांगितले.

यावेळी नागरिकांनी भदाणे यांना दोन महिन्यांपूर्वी त्याच्या विरोधात आपल्याकडे अनेक अर्ज दिले आहेत. त्या वेळी देखील आपण गुन्हा दाखल करुन घेतला नाही. याची आठवण करुन दिली. मात्र पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नागरिकांनी त्यांच्या कक्षातून बाहेर पडत, रस्त्यावर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी संतप्त नागरिकांनी “पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे हाय हाय, पोलीस निरीक्षक चले जाव, चले जाव, बिग बुलला पाठीशी घालणाऱ्या पोलीस निरीक्षकांचा धिक्कार असो.. ” अशा स्वरुपाच्या जोरदार घोषणा देऊन शेवगाव पोलिसांच्या संशयास्पद वर्तणुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

यावेळी भाकपचे सेंट्रल ब्युरोचे सदस्य कॉम्रेड संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, संजय गोरे, किशोर जगताप, मनोज नेमाने, रायभान दातीर यांच्यासह अनेक गुंतवणूकदार या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागूल, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, गुप्त वार्ता विभागाचे बाप्पासाहेब धाकतोडे, शाम गुंजाळ आदींनी आंदोलकांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिल्याने, रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र यावर आंदोलकांचे समाधान झाले नसल्याने, त्यांनी त्यानंतर उपविभागीय पोलीस सुनील पाटील यांची भेट घेऊ संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

शेअर मार्केट प्रकरणात विभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्या तत्परतेने मागील आठवड्यात तालुक्यातील गदेवाडी येथील एकावर पहिला शेअर ट्रेडरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी अन्याय झालेल्या लोकांनी पुराव्यासह आपले तक्रार अर्ज द्यावेत. आवश्यक कारवाई केली जाईल. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याशी चर्चा करून लोकांना फसविणाऱ्या ट्रेडर्स विरुद्ध कारवाई करण्याबाबत आश्वासित केले.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमछाक, सर्वोच्च धावसंख्या करत वेस्ट इंडिजने दिला धक्का

दरम्यान, गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळताच घोटण,खानापूर येथील नागरिक दुसऱ्या एका एजंटच्या विरोधात पुराव्यासह तक्रार अर्ज घेऊन आले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube