भाजपच्या ‘मोठ्या भाऊ’गिरीला देसाईंचा ठसका! साताऱ्यात विजयी होत दिला राजकीय इशारा

Satara District Bank Election : महायुतीत भाजप मोठा भाऊ आणि बाकीचे पक्ष धाकटे भाऊ, असे राजकीय चित्र निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असतो

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Satara District Bank Election

Satara District Bank Election : महायुतीत भाजप मोठा भाऊ आणि बाकीचे पक्ष धाकटे भाऊ, असे राजकीय चित्र निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असतो. मात्र, सत्तेत सहभागी असलो तरी राजकारणात आम्ही कोणाच्या मेहरबानीवर नाही, हेच जणू शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून दाखवून दिले आहे. पाटण सोसायटी मतदारसंघात भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव करत देसाई यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. देसाई यांना 58 मते मिळाली, तर पाटणकर यांना 46 मते मिळाली. 12 मतांच्या फरकाने मिळालेला हा विजय केवळ एका संचालकपदाचा नाही, तर पाटणच्या राजकारणात आपली ताकद अजूनही कायम असल्याचा ठणकावून दिलेला संदेश आहे.

विशेष म्हणजे, तब्बल 45 वर्षांनंतर देसाई गटाचा प्रतिनिधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळात जाणार आहे. त्यामुळे देसाई समर्थकांसाठी हा विजय प्रतिष्ठेचा असला, तरी भाजपसाठी मात्र आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. कारण राज्यात सत्तेच्या खुर्चीवर एकत्र बसणारे भाजप आणि शिंदेंची शिवसेना स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांना पाणी पाजण्याची संधी सोडत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या मंत्र्याचा घाव

पाटणची लढत साधीसुधी नव्हती. कारण, एका बाजूला राज्याचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), तर दुसऱ्या बाजूला भाजपचे स्थानिक नेते सत्यजितसिंह पाटणकर. पाटणकर हे जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक आपले सहकार क्षेत्रातील वर्चस्व टिकवण्याची होती. मात्र, देसाईंनी त्यांना रोखत संचालक मंडळात प्रवेश केला. राजकारणात पद, सत्ता आणि पक्षाचे बळ महत्त्वाचे असतेच; पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे आणि मतदारांशी असलेले समीकरण अधिक निर्णायक ठरते. पाटणमध्ये देसाईंनी नेमके हेच दाखवून दिले. भाजपच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला भाजपच्या परवानगीची गरज नाही, असा राजकीय अर्थ या विजयातून काढला जात आहे.

सत्तेत सोबत आहोत तुमच्या दावणीला बांधलेले नाही

गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) कुरबुरी सुरू आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघातील सचिन सानप यांना शिवसेनेने दिलेला पाठिंबा असो किंवा विविध स्थानिक निवडणुकांमधील उमेदवारीचे वाद असोत, महायुतीतील अंतर्गत धुसफूस वारंवार समोर येत आहे. भाजपला राज्यात आपले नेतृत्व कायम ठेवायचे आहे. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेलाही आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपचेच ऐकायचे आणि मित्रपक्षांनी केवळ दुय्यम भूमिका बजावायची, असे राजकारण फार काळ चालू शकत नाही. पाटणमधील निकालाने या वास्तवाची जाणीव भाजपला करून दिली आहे. सत्तेत सोबत आहोत म्हणजे राजकारणात तुमच्या दावणीला बांधलेले नाही, हाच संदेश देसाईंच्या विजयातून शिंदे गटाने दिल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.

देसाईंच्या विजयाने शिंदेंची बार्गेनिंग पॉवर वाढणार?

राजकारणात निवडणुकीतील विजय केवळ गुलाल उधळण्यासाठी नसतो, तर पुढच्या राजकीय वाटाघाटींसाठीही असतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जागावाटपाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. अशा वेळी शिंदेंच्या शिवसेनेला भाजपसमोर आपली ताकद मांडण्यासाठी पाटणचा निकाल दाखवता येणार आहे. शिंदे गटाला साताऱ्यात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला थेट आव्हान देता येते आणि ते आव्हान यशस्वीही करता येते, हे या निकालाने सिद्ध केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपने मित्रपक्षांना गृहीत धरण्याची चूक केली, तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागू शकतात असे मत जाणाकारांकडून व्यक्त केले जात आहे.

जयकुमार गोरेंनीही दाखवली ताकद

एकीकडे देसाई यांच्या विजयाची चर्चा सुरू झालेली असून या निकालावरून भाजप साताऱ्यात कमकुवत झाला असे म्हणता येणार नाही. कारण, माण सोसायटी मतदारसंघातून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी 53 मते मिळवत विजय मिळवला आहे. तर, जावळी मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर रांजणे यांनीही बाजी मारली आहे. म्हणजेच भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापल्या राजकीय प्रभावक्षेत्रात ताकद दाखवली आहे.

देसाईंची आता खरी कसोटी

शंभूराज देसाई यांच्यासाठी हा विजय ऐतिहासिक असला तरी, खरी परीक्षा आता सुरू होणार आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात प्रवेश मिळवणे ही पहिली पायरी आहे. या माध्यमातून पाटणमधील शेतकरी, विकास सोसायट्या आणि सहकार क्षेत्राला किती फायदा करून देता येतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासाठीही हा निकाल धोक्याची घंटा आहे. विद्यमान संचालक असूनही पराभव स्वीकारावा लागल्याने पाटणमधील राजकीय समीकरणांचा नव्याने विचार करावा लागणार आहे.

चक्रीवादळ ‘मुरसू’ चा महाराष्ट्राला धोका; पुणे, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट –

पाटणमध्ये शंभूराज देसाईंनी विजय मिळवून दाखवले की, राजकारणात ताकद ही केवळ पक्षाच्या चिन्हावर किंवा सत्तेच्या जोरावर ठरत नाही. ती मतपेटीतून सिद्ध करावी लागते आणि यावेळी पाटणमध्ये देसाईंनी ती करून दाखवली. त्यामुळे पाटणमध्ये देसाईंनी भाजपला पराभवाची चव चाखवत हा निकाल भाजपसाठी छोटा असला तरी, त्यातून मिळणारा राजकीय संदेश मोठा असल्याची चर्चा आता रंगली आहे.

follow us