वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हं; अधिवेशनातील चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार

नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन फक्त 7 दिवसांचं असल्यानं ते बोगस असल्याची काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची टीका.

  • Written By: Published:
Untitled Design (63)

Senior Congress leader Vijay Wadettiwar criticizes this year’s winter session : बऱ्याच दिवसांनंतर आता पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची मागणी जोर धरू लागली आहे. विदर्भातल्या नेत्यांकडे राज्याचं नेतृत्व असून देखील या भागाचा विकास खुंटला असलायचा आरोप करण्यात आला आहे. नागपूर(Nagpur)  येथे होणारे हिवाळी अधिवेशन फक्त 7 दिवसांचं असल्यानं ते बोगस असल्याची टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadattivar) यांनी केली आहे. या अधिवेशनात तरी विदर्भाला न्याय मिळणार का? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपदाची निवड अजून झालेली नाही. यावर मुद्द्यावर लक्ष वेधत त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. नाशिकच्या तपोवनात झाडे तोडण्याचा प्रश्न, वाढता ड्रग्सचा विळखा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी विरोधी पक्षाने केली असल्याचं दिसून येतंय. हाय कमांडकडे वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली जाईल आणि विदर्भातील ओबीसी, आदिवासी आणि इतर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही यावेळी त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान यंदाच्या हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळा विदर्भ झालाच पाहिले, अशी ठाम मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्रात एका विशिष्ट समाजाचं प्राबल्य वाढल्याचा आरोप देखील केला. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीत वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा होणार असल्याचं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. सत्ताधारी पक्षाकडून आम्हाला चहापानाचं निमंत्रण मिळालं असून दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते नाहीत. संवैधानिक पदं रिक्त ठेऊन संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सरकारच्या चहापानाचा आम्ही जाणार नाही. रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतकरी कर्जमाफीचा पत्ता नाही. त्याचप्रमाणे येथून मागे देखील विरोधकांची संख्या कमी असून देखील काँग्रेसने कधी संवैधानिक पद रिक्त ठेवले नाही, यांना विरोधकांची भीती वाटते की काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

कापसावरचं आयातशुल्क 11 टक्क्यांवरून शून्य केल्याने शेतकऱ्यांचा या सरकारवर रोष पाहायला मिळत आहे. राज्यात रोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 38 टक्के आत्महत्या या एकट्या महाराष्ट्रात होत आहेत. हे सरकार नतदृष्ठ असून तिघेही आपसांत भांडत आहेत. शेतकऱ्यांचा अवमान करणार हे सरकार असून यांच्यामुळे राज्याची तिजोरीमखाली झाली आहे. राज्याच्या एकूण उत्पन्नातील 22 टक्के हिस्सा कर्ज आणि व्याजावर खर्च होत आहे. राज्यात सर्वत्र भ्रष्टाचार फोफावला आहे. लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यात सरकार सपशेल फेल ठरलंय. महिलांवरील अत्याचाराचे 37 हजार गुन्हे राज्यभरात दाखल आहेत. लहान मुलींवरील अत्याचाराच्या बाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. गुंडाराज प्रस्थापित झालं आहे. पुणे हे तर गुन्हेगारांचा कॅपिटल बनत चाललं आहे. शेतकऱ्यांसोबत कंत्राटदाराची आत्महत्या करत आहेत. असे गंभीर आरोप यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केले आहेत.

follow us