ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा जोरात; मात्र, ‘या’ नाराजांच्या अनुपस्थितीचं गौडबंगाल काय?
Shiv Sena Melawa Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पहिला मेळावा मुंबईतील अंधेरीत संपन्न झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा बीकेसीमध्ये आयोजित करण्यात आला होता. (Shiv Sena) विधानसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा आहे. या दोन्ही मेळाव्यातील काही प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
उद्धवसेनेच्या मेळाव्याला पक्षाचे आमदार, खासदार हजर होते. अनेक आजी, माजी आमदार, खासदारही उपस्थित होते. पण माजी आमदार राजन साळवी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राजन साळवी उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राजापूर मतदारसंघातून सलग तीनदा विजय मिळवणाऱ्या साळवी यांचा शिंदेसेनेच्या किरण सामंत यांनी पराभव केला. तेव्हापासून साळवी नाराज असल्याची चर्चा आहे. ते उद्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
अमित शाह किस झाड की पत्ती, मराठी माणसांचा नाद करू नका; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला सुरुवात होईल, असा दावा शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. शिवसेनेत अनेक नेत्यांचा प्रवेश होणार आहे आणि त्याची सुरुवात रत्नागिरीतील माजी आमदारापासून होईल असं सामंत म्हणाले. त्यामुळे राजन साळवी यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जात आहे. त्यांच्यासोबत उद्धवसेनेचे कोणकोणते नेते पक्षाला जय महाराष्ट्र करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा बीकेसीमध्ये पार पडला. विधानसभा निवडणुकीत ५७ जागा निवडून आणल्यानंतरचा शिवसेनेचा हा पहिलाच भव्यदिव्य मेळावा आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे आमदार, खासदार, मंत्री हजर होते. पण माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. मंत्रिपद नाकारल्यापासून ते नाराज आहेत.
भूम-परांड्याचे आमदार असलेले तानाजी सावंत महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. नव्या सरकारमध्येही आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांना होती. त्यासाठी ते बरेच आग्रही होते. पण त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी पक्षाच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली. त्यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली.