Shivsena Vs BJP : मोदी एकटे नाही, त्यांच्यासोबत तपास यंत्रणांचे साप अन् विंचू; सामनातून जळजळीत टीका

Shivsena Vs BJP : मोदी एकटे नाही, त्यांच्यासोबत तपास यंत्रणांचे साप अन् विंचू; सामनातून जळजळीत टीका

मुंबई – राज्याच्या राज्यपाल पदावरून भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) पायउतार झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून कोश्यारींसह पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यात आता मोदींनी संसदेच्या आधिवेशनात केलेल्या एका भाषणाचा संदर्भ देत शिवसेनेने सामनातून मोदींवर जहरी टीका केली आहे. मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना संसदेत ‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं’, असे म्हणत विरोधकांना चिमटे काढले होते. मोदींच्या या वक्तव्याचा सामनातून चांगलाच समाचार घेण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी म्हणतात, की ‘मैं अकेला लढ रहा हूं और सबको भारी पड रहा हूं,’ हे काही खरे नाही. विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचे साप, विंचू, मगरी वगैरे त्यांनी पाळून ठेवले आहेत. इतकंच नाही तर, महाराष्ट्रात शिवसेनेशी (Shivsena) लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही. राज्यघटनेची व तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती, अशी टीकाही सामनातून करण्यात आली आहे.

आपण एकटेच सर्व विरोधकांना कसे भारी पडलो आहोत हे पंतप्रधान मोदी यांनी भर संसदेत छातीवर मूठ आपटून सांगितले. वेगळ्या भाषेत त्यास छाती पिटणे असे म्हणतात. असे छाती पिटून बोलणे पंतप्रधानपदास शोभत नाही. हाती पोलीस, न्यायालय, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज ठेऊन मी एकटातच लढत आहे व सगळ्यांना भारी पडत आहे, असे सांगणे मजेशीर आहे व ही मजा फक्त मोदीच करू शकतात, असा चिमटा काढला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अखेर राज्यातून जावे लागले. राज्यपालांना घालवले नसते तर जनता एक दिवस राजभवनातच घुसली असती इतका संताप त्यांच्याविषयी निर्माण झाला होता, अशी जहरी टीका सामनातून करण्यात आली आहे.

राज्याचे मावळते राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून मोदींनी मविआ सरकारविरुद्ध अनेक बेकायदेशीर कृत्ये करून घेतली. मविआ सरकार असताना कोश्यारी यांनी बहुमतातील सरकारच्या शिफारसींना केराची टोपली दाखविली. 12 नामनियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्त्या होऊ दिल्या नाहीत. त्यांच्या जागी आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस (Ramesh bais) आले आहेत. ते देखील मनाने आणि रक्ताने भाजप स्वयंसेवकच आहेत, असल्याचे या लेखात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube