माधुरी दीक्षितला आडनाव बदलण्याचा सल्ला कोणी दिला का? गौतमीच्या बचावासाठी सुषमा अंधारे सरसावल्या

माधुरी दीक्षितला आडनाव बदलण्याचा सल्ला कोणी दिला का? गौतमीच्या बचावासाठी सुषमा अंधारे सरसावल्या

Shivsena leader Sushma Andhare Facebook Post Over Gautami Patil Surname Controvers : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. गौतमीची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. त्यामुळं तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. मात्र, तिचे कार्यक्रम आणि कार्यक्रमातील गोंधळ आणि वाद हे तर एक समीकरणच झाले आहे. दरम्यान, आताही गौतमी एका वादात अडकली आहे. गौतमीने तिचे पाटील हे आडनाव बदलवावं, अन्यथा महाराष्ट्रात कार्यक्रम करू देणार नाही, अशी भूमिका एका मराठा संघटनेने घेतली आहे. तर मी ‘पाटील’ आहे, पाटीलच नाव लावणार, अशी ठाम भूमिका गौतमीने घेतली. या सगळ्यात कुणी गौतमीच्या समर्थनार्थ उभा आहे तर कुणी तिच्या विरोधात… शिवसेनेच्या उपनेत्या आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी गौतमीच्या समर्थनार्थ फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

अंधारे यांनी गौतमीची बाजू घेत लिहिलं फेसबुकवर लिहिलं की, नावात काही आहे की नाही याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. पण आडनावात काही नाही का? तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडलेले असते. वर्णश्रेष्ठतावाद आडनावात आहे. चातुर्वर्ण्य पद्धतीनुसार ब्राह्मण वर्णातील आडनाव ‘विद्यामय’ असावे. क्षत्रिय वर्णीयांची आडनावे ‘वीरमय’, वैश्यांची ‘व्यापारीमय आडनावे असावीत, तर शूद्रांची ‘द्वेषी आडनावे असावीत, असे मानले जाते.

अंधारे पुढं लिहितात की, ढोरगवार पशु शूद्र नारी सब तदन के अधिकारी’ ही ओळ एका अर्थाने शूद्र स्त्रिया किंवा प्राणी एकाच तराजूत तोलले पाहिजेत, अशा आशयाची आहे. शूद्र वर्णांमधील बहुतेक आडनावे वराह, बैल, पारवे, हत्ती, मांजरे, ईत्यादी प्राण्यांच्या नावांवरून दिसतात…!

20 व्या शतकाच्या उत्तरार्धानंतर, वर्ण प्रणाली तितकी जाणवत नाही. पण जातीव्यवस्थेची दाहकता आजही कायम आहे. हे विशेषतः ग्रामीण भागात जाणवते. त्यामुळे ग्रामीण भागातून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करणारी आणि अत्यंत उपेक्षित आणि शोषित वर्गातून आलेली नवी पिढी अनेकदा आपले आडनाव बदलून शहरी भागात स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करते. अशाप्रकारे लोकांना आपले आडनाव बदलावे लागते, हा त्या लोकांचा विजय आहे ज्यांना भारतीय समाजव्यवस्थेत जातिव्यवस्था मजबूत करायची आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

NCP चा 24 वा वर्धापन दिन : संग्राम जगताप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

बाबुराव बागुल हे अत्यंत ज्येष्ठ लेखक आणि आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नाव. त्यांचं जेव्हा मी जात चोरली होती, हे पुस्तक खऱ्या अर्थाने महत्वाचे ठरते. जयसिंगपूरमधील अनेक बौद्धांनी आपली आडनावे भाटिया, कुलकर्णी किंवा कर्णिक अशी बदललेली आहेत. तर नागपुरात अनेक बौद्धांनी पाटील अशी आडनावे लावलीत.

जळगाव, धुळे, चाळीसगाव परिसरात भाटय़ा विमुक्तात अनेक जाती जमातींची मूळ आडनावे वेगळी आहेत पण नंतर ही आडनावे पाटील झालेली दिसतात. थोडक्यात, या सर्व प्रयत्न जात ओळखली गेली तर बहुधा आपली संधी डावलली जाईल की काय या भीतीपोटीचा…

यात अजून एक वेगळ्या प्रकारची माणसं पण आहेत, की जी मूळ प्रस्थापित आहेत किंवा जी सवर्ण आहेत. मात्र त्यांची आडनावे त्यांना काहीशी अडचणीची वाटतात आणि म्हणून आडनावांच्या सोबत ते पाटील असेही बिरूद लावतात. उदाहरणार्थ माझ्या वर्गात माझ्यासोबत शिकणारा एक मुलगा त्याचे संपूर्ण इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे आडनाव गाढवे होते. मात्र मागील दोन वर्षात त्याने त्याचे आडनाव गाढवे पाटील असे केले. किंवा एखाद्याचे आडनाव काळोखे असेल तर काळोखे पाटील करणे, किंवा कोळसे असेल तर कोळसे पाटील करणे, आवारे असेल तर आवारे पाटील करणे…

गौतमी पाटील प्रकरणात मात्र अजूनच वेगळी गंमत आहे. तिला असलेले पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे. इथेही बाब उल्लेखनीय आहे की नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवार ला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..? असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.

एखाद्या मुलीला, माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दूषित आहे, ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे. पण तिचं माणूस पण स्वीकारणं तुम्हाला जड जातंय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे. आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटबळाच्या जोरावर अशी दडपशाही करता, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube