ती बैठक अन् शिंदेंना एक मिनिट उशीरा आलेला मेसेज निर्णायक ठरणार? शिंदेंच्या वकीलांचा जोरदार युक्तिवाद
Shivsena Party and Symbol राज्याच्या राजकारणात गेल्या 3-4 वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावर पुन्हा एकदा सुनावणी झाली.
Shivsena Party and Symbol Hearing Supreme Court Strong arguments by Shinde’s lawyers : राज्याच्या राजकारणात गेल्या 3-4 वर्षांपासून चर्चेत असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावर पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आहे. यामध्ये आज एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा युक्तीवाद सुरू आहे. शिंदेंचे वकील ध्रुव मेहता हे न्यायालयात बाजू मांडली यावेळी त्यांनी शिवसेना पक्षामध्ये फुट पडली तेव्हा पक्षाने बोलावलेल्या बैठकीबाबत मोठी माहिती दिली.
Health Tips : मॉर्निंग वॉक की, इव्हिनिंग वॉक?; तुमच्यासाठी योग्य वेळ कोणती?
शिवसेनेतील फुटीनंतर पक्षांतर्गत घडामोडींवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत ज्येष्ठ वकील मेहता यांनी न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे मांडले. शिवसेनेने बोलावलेली संबंधित बैठक ही संपूर्ण राजकीय पक्षाची नसून केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षाची होती, असा दावा त्यांनी आपल्या युक्तिवादात केला.
ती बैठक राजकीय पक्षाची नव्हती
मेहता यांनी २१ जून रोजी बोलावण्यात आलेल्या बैठकीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांना बैठकीची माहिती देणारा संदेश एक मिनिट उशिराने पाठवण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सुनील प्रभू यांनी काढलेल्या व्हिपमधून ही बैठक राजकीय पक्षाची नसून विधिमंडळ पक्षाची असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मेहता यांनी सांगितले. २१ जून रोजी दुपारी १२.३० वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांना बैठकीसंदर्भातील व्हॉट्सॲप संदेश १२ वाजून ३१ मिनिटांनी पाठवण्यात आला होता, असे त्यांनी न्यायालयात नमूद केले.
बैठकीचा कोणताही ठरावीक अजेंडा नव्हता
२१ जूनच्या बैठकीसाठी सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीचे पत्र शिवसेना विधिमंडळ पक्षातील सदस्यांना पाठवण्यात आले होते. या पत्रातून सदस्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, बैठकीत नेमकी कोणती चर्चा होणार किंवा तिचा विशिष्ट अजेंडा काय असेल, याचा उल्लेख पत्रात नव्हता. एकनाथ शिंदे यांना बैठकीच्या दिवशी दुपारी १२.३१ वाजता संदेश पाठवण्यात आला होता. मात्र, केवळ या बाबीवरून कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असा युक्तिवादही मेहता यांनी केला.
शिंदेंना गटनेतेपदावरून हटवण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह
दरम्यान, वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या समर्थनार्थ अनेक आमदारांच्या सह्या असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संबंधित सह्यांची सत्यता तपासण्यात आली नव्हती, असा मुद्दाही मेहता यांनी न्यायालयात उपस्थित केला. त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या बैठका, त्यांना पाठवण्यात आलेले संदेश आणि गटनेतेपद बदलण्याच्या निर्णयावरून न्यायालयातील युक्तिवादाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणीत आणखी कोणते मुद्दे समोर येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.