सोमय्यांचा व्हिडिओ दाखवणाऱ्या चॅनलचे प्रक्षेपण बंद! माध्यमांच्या आवाज दाबला जात असल्याचा आरोप

सोमय्यांचा व्हिडिओ दाखवणाऱ्या चॅनलचे प्रक्षेपण बंद! माध्यमांच्या आवाज दाबला जात असल्याचा आरोप

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ लोकांसमोर आणणाऱ्या लोकशाही चॅनेलचे प्रक्षेपण बंद आहे. मागील काही तासांपासून चॅनेल ऑन एअर सेवा ठप्प झाली आहे. मात्र चॅनेलचे युट्यूब माध्यमातून प्रसारण सुरु आहे. दरम्यान, हा माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेना (UBT) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मात्र ही सेवा काही तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याचे चॅनेलचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी स्पष्ट केलं आहे. (Some technical problems, the broadcast of ‘Lok Shahi Marathi’ news channel has been stopped for the last few hours)

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

लोकशाही चॅनल दोन तासांपासून बंद आहे.. सत्तेचा खेळ किती क्रूर असू शकतो? लोकशाहीचा चौथा खांब म्हणून प्रसारमाध्यमांनी सत्य दाखवायचं ठरवल्यावर कसा आवाज दाबला जातो त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण #Support_लोकशाही, असं ट्विट सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

मुख्य संपादक काय म्हणाले?

तर काही तांत्रिक अडचणींमुळे ‘ लोकशाही मराठी ‘ वृत्त वाहिनीचे प्रक्षेपण गेल्या काही तासांपासून बंद आहे. लवकरच आपल्या सेवेत रुजू होऊ ! असं या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांनी ट्विट करुन स्पष्ट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे काही कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही या वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी लोकांसमोर आणले. या प्रकरणावरुन संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. यानंतर हे व्हिडीओ समाज माध्यमांवरही व्हायरल झाले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोमय्या यांनी एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप होऊ लागला आहे. यामुळे सोमय्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असतानाच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सभागृहातही या प्रकरणाचे पडसाद पाहायला मिळाले.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या व्हिडिओ प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्याशी संबंधित एक पेनड्राईव्ह उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला आहे. विधानसभेत विरोधकांनी मागणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तर दानवे यांनी सोमय्या यांच्याशी संबंधित एक पेन ड्राईव्ह सादर करणार असल्याचा दावा केला होता. यानुसार त्यांनी एक पेनड्राईव्ह उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube