लालपरीची चाके पुन्हा थांबणार! ST कर्मचाऱ्यांचे 13 सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत उपोषण, सरकार कोंडीत सापडणार?
धुळे : ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (Agitation of ST employees) पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. मविआ सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चांगलाच गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी कामगारांची शेवटपर्यंत मागणी होती. यासाठी सुमारे सहा महिने एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानावर ठाण मांडून होते. दरम्यान, आता विविध 29 प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने (Maharashtra ST Labor Union) 13 सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात एकाच वेळी बेमुदत संप पुकारला होता. या वेळी महामंडळाने अनेक मागण्या मान्य केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. मात्र, मान्य केलेल्या मागण्या एसटी महामंडळाने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने 13 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण पुकारले आहे. त्यामुळे राज्यभरातील लाल परी सेवा पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
तत्पूर्वी 11 आणि 12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी मुंबईतील आझाद मैदानावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण करणार आहेत. जर या दोन दिवसांत सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी चर्चा करण्यासाठी बोलावले नाही, तर 13 पासून राज्य भरात एसटी कामगार संघटने तर्फे उपोषण पुकारले जाणार आहे.
या उपोषणात सहभागी होणाऱ्या धुळ्यातील तसेच राज्यभरातील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश एसटी महामंडळाच्या सामान्य प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी राज्यभरातील विभाग नियंत्रक यांना दिले आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त करण्यासाठी एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी कर्चचाऱ्यांना भेटावे, त्यांना महामंडळाच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीची व उपोषणात सहभागी झाल्याबद्दल होणाऱ्या कारवाईची माहिती देण्याबाबत विभाग नियंत्रक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
एसटी महामंडळाने अद्यापही आमच्या मागण्या पूर्ण न केल्याने आम्ही उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आमचे 50 हजार सभासद असून आम्ही आमरण उपोषण केल्यास एसटी महामंडळाकडून जी कारवाई होईल त्या कारवाईल आमची सामोरे जाण्याची तयारी आहे,असं एसटी कामगार संघटनेचे अध्य योगराज पाटील यांनी सांगितलं
तर संबंधित संघटेनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनशी आम्ही त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करणार आहोत. उपोषण काळात प्रवासी सेवेवर परिणाण होऊ नये, म्हणून आम्ही आवश्यक त्या सर्व योजना करणार आहोत, असं विभागीय नियंत्रक विजय गीते यांनी सांगितलं.