सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलांना धक्का; प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावरुन हटवलं?
NCP On Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असणाऱ्या घडमोडींमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
NCP On Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असणाऱ्या घडमोडींमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी देण्यात आली आहे मात्र या यादीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या नावावर समोर कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात न आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
या यादीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल पटेल (Praful Patel) यांच्या नावासमोर राष्ट्रीय कार्याध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही नेते पक्षात कोणत्याही पदावर नाही का? याबाबत आता प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात राष्ट्रवादीकडून अरुणाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आले आहे. तर सुनील तटकरे यांच्या नावासमोर लोकसभा नेते आणि प्रफुल पटेल यांच्या नावासमोर राज्यसभा नेते असा उल्लेख करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाला (Election Commission) पाठवलेला पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी टाइपिंग मिस्टेक असून लवकरच यात बदल करण्यात येणार असल्याची माहिती एक्स वर पोस्ट करत दिली होती मात्र आतापर्यंत या पत्रात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याची माहिती समोर आल्याने सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल पटेल पक्षाचे कार्याध्यक्ष नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि पक्षाचे जनरल सेक्रेटीर पार्थ पवार यांच्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचं शीतयुद्ध सुरु असल्याने पक्षाने त्यांना प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावरुन मुक्त केल्याचे देखील सांगितले जात आहे मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती पक्षाकडून देण्यात आलेली नाही.