अखेर गोगावलेंना तटकरे जड पडले; मुलासाठी जागा खेचून आणली? काय आहे फॉर्म्युला
जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार असून काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक (Election) जाहीर झाली असून त्यामध्ये कोकण विधान परिषदेच्या जागेवरून आता मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. कोकणच्या जागेसाठी शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ दिसत आहे. या एका जागेसाठी आधीच अनेक दावेदार असताना आता राज्याचे मंत्री भरत गोगावले देखील आपल्या मुलासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. दरम्यान, ही जागा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी खेचून आणली अशी चर्चा सुरू झाली आहे.
कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी भरत गोगावले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले या जागेसाठी इच्छुक आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याची माहिती आहे. तर दुसरीकडं एकीकडं ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी ताकद लावल्याची माहिती आहे. सुनील तटकरे हे त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यासाठी आग्रही आहेत. त्यांना ही जागा दिल्याचं आता जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे.
महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा होणार असून काही जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या प्राथमिक चर्चेतील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जागा वाटपावर होणार अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. येत्या आठवड्याभरात जागा वाटपावर महायुतीत एकमत होण्याची शक्यता आहे.
संभाव्य फॉर्म्युला काय?
भाजप 12
शिवसेना 03
राष्ट्रवादी 02
कुठल्या जागेवर कोणत्या पक्षाचा दावा?
राष्ट्रवादी काँग्रेस – रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग, हिंगोली – परभणी
शिवसेना – ठाणे, नाशिक, यवतमाळ
भाजप – नागपूर, वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर – जालना, सातारा – सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा – गोंदिया, अमरावती, लातूर – धाराशीव – बीड, सोलापूर