‘मातोश्री’वरील बैठकीत ठाकरे गटाची एकजूट; सर्व 9 खासदार उपस्थित असल्याचा संजय राऊतांचा दावा
बैठकीसाठी मातोश्रीवर उपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दीना पाटील यांच्या समावेश होता.
Thackeray group’s unity in the meeting on ‘Matoshree’ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या लोकसभा खासदारांची महत्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीपूर्वी काही खासदार गैरहजर असून न रिचेबल असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
राऊत यांनी सांगितले की, पक्षाचे सर्व नऊ लोकसभा खासदार या बैठकीत सहभागी झाले होते. काही खासदार वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे मुंबईत प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी ऑनलाईन किंवा मोबाईलच्या माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदवला. बैठकीसाठी प्रत्यक्ष मातोश्रीवर उपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दीना पाटील यांच्या समावेश होता.
माझ्या नावाने जर कुणी पैसे मागत असेल, तर मी राजीनामा देईन, सरपंचांच्या तक्रारीनंतर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य
तर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे पत्नीच्या आजारपणामुळे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर मुलाच्या प्रकृतीच्या कारणास्तव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख कौटुंबिक कार्यक्रमामुळे, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर मतदारसंघातील राजकीय व्यस्ततेमुळे आणि परभणीचे खासदार संजय जाधव पूर्वनियोजित कौटुंबिक कार्यक्रमामुळे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत. मात्र, या सर्वांनी ऑनलाईन किंवा फोनच्या माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदवला.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना या बैठकीमुळे उत्तर मिळाल्याचं मानलं जात आहे. पक्षातील सर्व खासदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभे असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. राऊत म्हणाले की, पक्षात दर महिन्याला अशा नियमित बैठक घेतल्या जातात. या बैठकीत उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.