मुंबईतील तीन नामांकित हॉटेलचे परवाने निलंबित; पथक थेट किचनमध्ये, पुढ दिसलं ते भयंकर…
अमरावतीतील तिवसा येथे ट्रकमधून ५५ लाख रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाने १३ जुलै रोजी राज्यभर (FDA) राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थ, प्रतिबंधित अन्नपदार्थ, हॉटेल-रेस्टॉरंट तसेच इतर अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण १ कोटी ६८ लाख ५ हजार १११ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच ३२ हॉटेल, रेस्टॉरंट व ढाब्यांची तपासणी करून ८ सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर ४ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले.
सर्वात मोठी कारवाई भिवंडी (जि. ठाणे) येथे करण्यात आली. मे. साई कार्गो मूव्हर्स या गोदामातून २२,१०० किलो स्प्रे ड्राईड स्किम्ड मिल्क पावडर जप्त करण्यात आली. या साठ्याची अंदाजे किंमत १ कोटी ३३ हजार रुपये असून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. उत्पादन मिसब्रँडेड व उपमानांकित असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
स्मार्ट मीटरमध्ये खरचं कॅमेरा आहे का? महावितरणाचा थेट कारवाईचा इशारा
प्रतिबंधित अन्नपदार्थांवरही मोठी कारवाई करण्यात आली. अमरावतीतील तिवसा येथे ट्रकमधून ५५ लाख रुपयांचा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. विरार (पूर्व) येथे १.९६ लाख रुपयांचा, मिरा रोड येथे २.८५ लाख रुपयांचा तर रायगड येथे ३.९० लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या कारवाईत ५ ठिकाणी छापे, ७ जणांना अटक, ४ गुन्हे आणि ६७.३० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
मुंबईतील तीन नामांकित हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामध्ये शालीमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. भेंडीबाजार, नूर मोहम्मदी हॉटेल, भेंडीबाजार आणि रहमानिया रेस्टॉरंट, उमरखाडी यांचा समावेश आहे. स्वच्छतेचे गंभीर उल्लंघन, अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणे, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अभाव, कीटक नियंत्रणातील त्रुटी आणि अस्वच्छ स्वयंपाकगृह आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. तसेच अमरावतीतील एका विनापरवाना आस्थापनाला व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली.