फलकांच्या अभावामुळे आणखी दोन बळी; मांडवा फाट्यावरील टी-पॉइंटवर दुचाकी-रिक्षा अपघातात दोघांचा मृत्यू

भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या लोडिंग रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Untitled Design 60

Two killed in bike-rickshaw accident : सिंदखेड राजा तालुक्यातील मांडवा फाट्यावरील टी-पॉइंट वळणावर 30 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने समोरून येणाऱ्या लोडिंग रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या या दोघांवर काळाने घाला घातल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन नांदुरकर (वय 29) आणि शुभम पांडुरंग वंजाळे (वय 28, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) हे दोघे पुण्याहून बिबी येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर ते आपल्या गावी परतण्यासाठी दुचाकीने निघाले होते. मात्र मांडवा फाट्याजवळील धोकादायक टी-पॉइंटवर त्यांची दुचाकी (MH 27 BH 6276) मलकापूर पांग्राकडून येणाऱ्या लोडिंग रिक्षा (MH 21 5364) ला समोरासमोर धडकली.

या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की रोशन नांदुरकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर शुभम वंजाळे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हलवण्यात येत असताना, वाटेतच त्यानेही अखेरचा श्वास घेतला.

प्रतीक्षा संपली! 12 वीचा निकाल 2 मे ला; विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार

या घटनेची माहिती मिळताच बिबी पोलीस स्टेशन चे ठाणेदार चंद्रकांत पाटील, तसेच पोलीस कर्मचारी रवी चव्हाण, दिनेश चव्हाण आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य केले.

दरम्यान, मांडवा फाटा, मलकापूर पांग्रा, तसेच दुसरबीड टी-पॉइंट या भागांमध्ये दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वारंवार अपघात घडत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या मार्गावर वेग नियंत्रित करणारे गतिरोधक नसल्याने वाहनचालकांना वळणाचा अंदाज येत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या ठिकाणी योग्य दिशादर्शक फलक, चेतावणी चिन्हे आणि गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दोन कुटुंबांवर शोककळा पसरली असून, आनंदाच्या प्रसंगानंतर अवघ्या काही तासांतच दुःखाचे सावट पसरल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

follow us