धैर्यशील मोहिते पाटलांनी केसानी गळा कापला; राष्ट्रवादी शरद पवार गटात आमदार खासदारात जुंपलं
काल माझ्यासोबत त्यांनी घात केला किंवा दगा दिला तो आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हता. या निवडणुकीत वसंतराव देशमुख यांना मतदान करणार नाही, असं उत्तमराव जानकर म्हणाले.
विधानपरिषदेच्या सोलापूर (Solapur) स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे. या निवडणुकीत माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचा मुलगा जीवन जानकर याने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागं घेण्याच्या शेवटच्या तासात घडलेल्या घडामोडींनंतर जीवन जानकर यांनी उमेदवारी अर्ज मागं घेतला. यानंतर आमदार उत्तमराव जानकर यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केसानं गळा कापल्याचा आरोप केला.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील उत्तर दिलं आहे, माझ्या घरातला प्रश्न आहे तो आम्ही घरात बसून संपवू, असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी यासंदर्भात म्हटलं आहे. कालच्या घडामोडी पाहता माझ्या मुलाची उमेदवारी फायनल ठेवण्याचं ठरलेलं होतं, तशा बैठका झाल्या होत्या. सगळ्यात सुरुवातीला ही निवडणूक मोहिते पाटलांनी लढावी आणि त्या पद्धतीची चर्चा झाली होती. त्यानंतर माझे चिरंजीव जीनव जानकर यांची उमेदवारी फायनल केली. त्यावर अर्जुनसिंह मोहिते पाटलांनी सही केली. मात्र, त्यानंतर दोन दिवसात वसंतराव देशमुख यांचा अर्ज भरणं हे आम्हाला खटकणारं होतं.
दोन दिवसाच्या घडामोडीत माझ्या मुलाची उमेदवारी त्यांनी फायनल केली होती. पण काल दोन ते अडीचच्या दरम्यान वसंतराव देशमुख मोबाईल फोन स्विच ऑफ करुन नॉट रिचेबल झाले. एक प्रकारे मोहिते पाटलांनी माझा केसानं गळा कापला अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिली आहे. ज्याच्या मागे त्याच्या तालुक्यात एकही मत नाही त्याला उमेदवारी मोहिते पाटलांनी का दिली, असा सवाल उत्तमराव जानकर यांनी केला.
वसंतराव देशमुख यांच्यासोबत या निवडणुकीत नाही, असं उत्तमराव जानकर म्हणाले. आमदार अभिजीत पाटील आणि आमदार नारायण पाटील यांना मोहिते पाटील यांच्या भूमिका पटत नव्हत्या. काल माझ्यासोबत त्यांनी घात केला किंवा दगा दिला तो आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हता. या निवडणुकीत वसंतराव देशमुख यांना मतदान करणार नाही, असं उत्तमराव जानकर म्हणाले. आमदार उत्तमराव जानकर वसंतराव देशमुख यांना मतदान न करण्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मधील मोहिते पाटील विरुद्ध इतर नेते हा संघर्ष समोर आला आहे.
या घडामोडीचा फायदा भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना होणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्तमराव जानकर यांच्या आरोपाबद्दल विचारलं असता माझ्या घरातला प्रश्न आहे तो आम्ही घरात बसून संपवू, असं म्हटलं. प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी आहे, माझी पद्धत आहे की, मी घरातला विषय चव्हाट्यावर मांडत नाही, असंही मोहिते पाटील यांनी सांगितलं.